India EU FTA: नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी भारत आणि यूरोपीय संघ (EU) यांच्यातील मुक्त व्यापार कराराचं (FTA) वर्णन 'धोरणात्मक संरेखन' (Strategic Alignment) असं केलं. अमेरिकेनं लावलेल्या उच्च शुल्काच्या पार्श्वभूमीवर बॅनर्जी म्हणाले की, हा करार अमेरिकेला एक संदेश देतो की, 'आम्हाला अमेरिकेची तितकी गरज नाही जेवढी अमेरिकेला वाटते.' मात्र, जोपर्यंत भारत आपली कार्यक्षमता आणि लॉजिस्टिक्समध्ये मोठी सुधारणा करत नाही, तोपर्यंत या कराराचा आपोआप मोठा फायदा होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या कराराला 'मदर ऑफ ऑल डील्स' असं संबोधलं जात आहे.
अमेरिकेसोबतची वाटाघाटी, धोरणात्मक महत्त्व
बॅनर्जी यांच्या मते, हा करार अमेरिका आणि भारत दोघांच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा संकेत आहे. जेव्हा अमेरिकेला वाटाघाटींच्या टेबलावर आणायचं असेल, तेव्हा हे धोरण उपयुक्त ठरू शकतं. त्यांनी नमूद केलं की, अमेरिकेनं भारतासोबत चर्चा करण्यात मर्यादित रस दाखवला आहे. ट्रम्प प्रशासनासोबत भारत आणि युरोप या दोघांच्याही संबंधांमध्ये आलेल्या थंडाव्यामुळे या व्यापार कराराला नवी गती मिळाली असल्याचं मानलं जातं.
SBI-HDFC Bank मध्ये कोणाचं Home Loan आहे स्वस्त? ₹७० लाखांच्या लोनसाठी किमान किती असावी सॅलरी?
भारत-ईयू करारावर भाष्य करताना बॅनर्जी म्हणाले की, हे केवळ सुरुवातीचं पाऊल आहे. दोन अब्ज लोकांसाठी बाजारपेठ निर्माण करणारा हा एक ऐतिहासिक करार असला तरी, "तुमच्याकडे विकण्यासाठी उत्पादनं असणं आवश्यक आहे आणि बाजारपेठेला त्या उत्पादनांची ओढ असायला हवी." आजची स्पर्धा केवळ टॅरिफपुरती मर्यादित राहिलेली नाही, यावर त्यांनी भर दिला.
कराराचा फायदा आणि विविध क्षेत्रे
या करारामुळे जागतिक जीडीपीच्या एक चतुर्थांश भागाचं प्रतिनिधित्व होणार आहे. यूरोपीय संघ भारतीय निर्यातीवर ९९% तर भारत यूरोपीय निर्यातीवर ९७% टॅरिफ कमी करणार आहे. याचा फायदा भारताला कापड, चामड्याच्या वस्तू, हस्तशिल्प आणि सागरी उत्पादनांच्या क्षेत्रात होईल, तर युरोपला मद्य, ऑटोमोबाईल, रसायने आणि फार्मास्युटिकल्स क्षेत्रात लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
वितरणाचा वेग हा खरा अडथळा
खरा अडथळा उत्पादनाच्या वितरणाचा वेग आणि सप्लाय चेनच्या कार्यक्षमतेत असल्याचं बॅनर्जी यांनी सांगितले. त्यांनी व्हिएतनाम आणि बांगलादेशसारख्या प्रतिस्पर्ध्यांचा उल्लेख करत म्हटलं की, भारतीय वाहतूक व्यवस्था आणि बंदरे अजूनही संथ आहेत. अमेरिकेतील किरकोळ विक्रेत्यांच्या मते भारतीय उत्पादक संथ असून, कार्यक्षमतेच्या बाबतीत भारताला अजून प्रगती करणं आवश्यक आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारत आणि ईयू दरम्यान १३६ अब्ज डॉलरचा व्यापार झाला.
चीनसोबतची तुलना
चीनची तुलना करताना बॅनर्जी म्हणाले की, तिथले पुरवठादार अत्यंत वेगानं काम करतात. जर दोन देशांच्या किमती समान असतील, तर खरेदीदार त्याच देशाला प्राधान्य देतील जो जलद डिलिव्हरी देईल. "जर आपण चीनसारखी कार्यक्षमता गाठली, तरच या कराराचं रूपांतर मोठ्या नफ्यात करू शकू. हे सर्व आपोआप होणार नाही," असं त्यांनी स्पष्ट केले. रशियन तेलाच्या खरेदीवरून अमेरिकेने भारतावर ५०% पर्यंत टॅरिफ लावलं असून भारतानं ही कारवाई अतार्किक असल्याचं म्हटलंय.
