Rekha Jhunjhunwala Investment: गेल्या काही दिवसांपासून टाटा समूहाची ज्वेलरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'टायटन'च्या शेअर्सवर मोठा दबाव दिसून येत आहे. अवघ्या चार दिवसांत या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेषतः दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांची संपत्ती या घसरणीमुळे २८०० कोटी रुपयांहून अधिक कमी झाली.
४ दिवसांत झुनझुनवालांच्या संपत्तीत मोठी घट
शेअर मार्केटचे 'बिग बुल' दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांची टायटन कंपनीत मोठी गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे कंपनीचे ४,७१,८४,४७० शेअर्स असून त्यांचा हिस्सा ५.३१ टक्के आहे. ८ मे २०२६ रोजी टायटनचा शेअर ४६०१.१० रुपयांवर होता, जो १३ मे २०२६ पर्यंत ३९८७.५५ रुपयांवर खाली आला. अवघ्या चार दिवसांत शेअर ६१३.५५ रुपयांनी घसरल्यामुळे रेखा झुनझुनवाला यांच्या नेटवर्थमध्ये २८९५ कोटी रुपयांची घट झाली आहे.
तिमाही निकालात नफ्यात ३५ टक्क्यांची वाढ
शेअरमध्ये घसरण होत असली तरी कंपनीच्या तिमाही कामगिरीत सुधारणा दिसून आली आहे. ३१ मार्च २०२६ ला संपलेल्या चौथ्या तिमाहीत टायटनला ११७९ कोटी रुपयांचा एकत्रित नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत हा नफा ८७१ कोटी रुपये होता, म्हणजेच नफ्यात वार्षिक ३५ टक्क्यांची वाढ झाली. तसंच कंपनीचं एकूण उत्पन्न ४६ टक्क्यांनी वाढून २०,३०० कोटी रुपयांवर पोहोचलं. या चांगल्या कामगिरीमुळे कंपनीच्या बोर्डानं भागधारकांसाठी प्रति शेअर १५ रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे.
बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा इतिहास
टायटननं यापूर्वी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचा लाभही दिला आहे. जून २०११ मध्ये कंपनीनं १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स वाटले होते. त्याच वेळी कंपनीनं आपल्या शेअरचे विभाजन देखील केले होते, ज्यामध्ये १० रुपये फेस व्हॅल्यू असलेला शेअर १-१ रुपयाच्या १० तुकड्यांमध्ये विभागला गेला होता.
मार्च २०२६ च्या आकडेवारीनुसार, टायटन कंपनीमध्ये प्रवर्तकांकडे ५२.९० टक्के हिस्सा असून सार्वजनिक भागधारकांकडे ४७.०२ टक्के हिस्सा आहे. जरी कंपनीचे आर्थिक निकाल चांगले असले, तरी गेल्या काही दिवसांतील शेअरमधील वेगवान घसरणीनं बाजारपेठेत चर्चेला उधाण आलं आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
