S Jaishankar On Russian Crude Oil: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेकडून, भारत हा रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद करणार असल्याचा सातत्यानं दावा करण्यात येत आहे. दरम्यान पुन्हा एकदा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी, भारतानंरशियाकडून तेल खरेदी बंद करण्याची बांधिलकी व्यक्त केली असल्याचं व्यक्त केलं. भारतानंही काही दिवसांपूर्वीच ऊर्जा खरेदीमध्ये 'राष्ट्रीय हित' हाच 'मार्गदर्शक घटक' असेल असं स्पष्ट केलं असताना हे विधान समोर आले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीला भारतासोबतच्या व्यापारी कराराची घोषणा करताना म्हटले होते की, भारत रशियाकडून कच्चं तेल न खरेदी करण्यावर सहमत झाला आहे. तेव्हापासून अमेरिकेने हा दावा वारंवार केला आहे. म्युनिच सुरक्षा परिषदेत बोलताना रुबिओ म्हणाले की, भारतासोबतच्या चर्चेत आम्हाला रशियाकडून अतिरिक्त तेल न खरेदी करण्याबाबत त्यांचं आश्वासन मिळालं आहे.
जयशंकर यांनी मांडली भारताची भूमिका
त्याच परिषदेत अमेरिकेसोबतच्या व्यापारी करारामुळे रशियासोबतच्या ऊर्जा संबंधांवर परिणाम होईल का, या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं, भारत आपल्या धोरणात्मक स्वायत्ततेसाठी ठामपणे वचनबद्ध आहे. हे भारताच्या इतिहासाचा आणि विकासाचा भाग असून सर्व राजकीय पक्षांमध्ये यावर एकमत असल्याचं त्यांनी नमूद केले. जागतिक कच्च्या तेलाची बाजारपेठ ही जटिल आणि गतिशील असल्याचे सांगून जयशंकर म्हणाले की, भारतातील तेल कंपन्या युरोप आणि जगातील इतर भागांप्रमाणेच उपलब्धता, खर्च आणि जोखीम पाहून स्वतःच्या हितानुसार निर्णय घेतात.
सोन्या-चांदीच्या आयातीत मोठी वाढ
व्यापारी कराराच्या घोषणेनंतर ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशाद्वारे भारतावर लादलेले अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ मागे घेतलं होतं. दुसरीकडे, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एप्रिल ते जानेवारी दरम्यान चीन, यूएई, रशिया, अमेरिका आणि सौदी अरेबियाकडून सर्वाधिक आयात करण्यात आली. विशेष म्हणजे, रशिया सोडून इतर सर्व देशांकडून होणाऱ्या आयातीत वाढ झाली आहे. देशाची निर्यात जानेवारीत किरकोळ वाढून ३६.५६ अब्ज डॉलर्सवर पोहोचली असली तरी, व्यापारी तूट वाढून ३४.६८ अब्ज डॉलर्स या तीन महिन्यांतील उच्चांकी स्तरावर पोहोचली.
अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत घट
सोने आणि चांदीच्या आयातीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे जानेवारीत एकूण आयात १९.२ टक्क्यांनी वाढून ७१.२४ अब्ज डॉलर्स झाली आहे, जी चालू आर्थिक वर्षातील आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. जानेवारी महिन्यात सोन्याची आयात ३४९.२२ टक्क्यांनी वाढून १२ अब्ज डॉलर्स, तर चांदीची आयात १२७ टक्क्यांनी वाढून दोन अब्ज डॉलर्सवर पोहोचली. दरम्यान, अमेरिकेनं लादलेल्या उच्च शुल्कामुळे जानेवारीत अमेरिकेला होणारी भारताची वस्तू निर्यात २१.७७ टक्क्यांनी घटून ६.६ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यातही अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत घट नोंदवण्यात आली होती.
