Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > उन्हाळी सुट्ट्यांना महागाईचा फटका; देशांतर्गत अन् आंतरराष्ट्रीय विमानभाडे गगनाला भिडले...

उन्हाळी सुट्ट्यांना महागाईचा फटका; देशांतर्गत अन् आंतरराष्ट्रीय विमानभाडे गगनाला भिडले...

Airline Ticket Price Hike: लेह, श्रीनगर आणि शिमल्याच्या तिकिटांमध्ये मोठी वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 13:13 IST2026-05-08T13:12:55+5:302026-05-08T13:13:36+5:30

Airline Ticket Price Hike: लेह, श्रीनगर आणि शिमल्याच्या तिकिटांमध्ये मोठी वाढ!

Airline Ticket Price Hike: Summer holidays hit by inflation; Domestic and international airfares skyrocket | उन्हाळी सुट्ट्यांना महागाईचा फटका; देशांतर्गत अन् आंतरराष्ट्रीय विमानभाडे गगनाला भिडले...

उन्हाळी सुट्ट्यांना महागाईचा फटका; देशांतर्गत अन् आंतरराष्ट्रीय विमानभाडे गगनाला भिडले...

Airline Ticket Price Hike: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गांवरील विमान प्रवासाचे भाडे तब्बल ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. जेट इंधनाच्या वाढत्या किंमती, पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेल्या एअरस्पेस अडचणी आणि विमान कंपन्यांकडून उड्डाण क्षमता कमी करण्यात आल्याने तिकिटांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. परिणामी, आता अनेक भारतीय पर्यटक युरोप-अमेरिकेऐवजी दक्षिण-पूर्व आशियातील स्वस्त देश आणि देशांतर्गत हिल स्टेशनकडे वळताना दिसत आहेत.

लेह, श्रीनगर आणि शिमल्याच्या तिकिटांमध्ये मोठी वाढ

मीडिया रिपोर्टनुसार, दिल्ली ते लेह या मार्गावरील विमानभाड्यात वर्षभरात जवळपास ७४ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर श्रीनगर आणि शिमला येथील तिकिटांचे दर ६० ते ६८ टक्क्यांनी महागले आहेत. देशातील तीव्र उष्णता आणि हीटवेव्हमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात थंड हवेच्या ठिकाणी प्रवास करत आहेत. त्यामुळे हिल स्टेशनसाठी मागणी झपाट्याने वाढली आहे.

लंडन-पॅरिस प्रवासही महागला

आंतरराष्ट्रीय मार्गांवरही परिस्थिती वेगळी नाही. लंडन आणि पॅरिससाठी विमान तिकिटांचे दर ५३ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. तर सिडनीसाठीचे तिकीट सुमारे ३८ टक्क्यांनी महागले आहे. लोकप्रिय पर्यटनस्थळे असलेल्या थायलंड आणि सिंगापूरसाठीचे भाडेदेखील ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाढले आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय प्रवाशांच्या बजेटवर मोठा परिणाम होत आहे.

विमानभाडे वाढण्यामागची प्रमुख कारणे

विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या वाढीमागे अनेक कारणे आहेत. त्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे जेट फ्युएलच्या किंमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ. एप्रिलच्या अखेरीस जागतिक स्तरावर जेट फ्युएलची किंमत प्रति बॅरल १७९ डॉलरपर्यंत पोहोचली होती, जी फेब्रुवारीच्या तुलनेत सुमारे ८० टक्के अधिक आहे. याशिवाय पश्चिम आशियातील तणाव आणि काही एअरस्पेस बंद झाल्यामुळे अनेक विमानांना लांब मार्गाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे इंधन खर्च आणि ऑपरेशनल खर्च दोन्ही वाढले आहेत.

विमान कंपन्यांनी उड्डाणे कमी केली

IndiGo ने मे महिन्यात आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाण क्षमतेत फेब्रुवारीच्या तुलनेत १७ टक्क्यांची कपात केली आहे. तर Air India देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर दररोज सुमारे १०० उड्डाणे कमी करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. याचा सर्वाधिक परिणाम युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरला जाणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे.

भारतीय पर्यटकांचा ट्रेंड बदलतोय

महागड्या विमानभाड्यामुळे भारतीय प्रवाशांचा ट्रॅव्हल पॅटर्नही बदलताना दिसत आहे. ट्रॅव्हल कंपन्यांच्या माहितीनुसार, लोक आता लांब पल्ल्याच्या आणि महागड्या सहली टाळत असून, कमी खर्चिक आणि व्हिसा-फ्री देशांना प्राधान्य देत आहेत. विशेषतः थायलंड, व्हिएतनाम, श्रीलंका, नेपाळ आणि मलेशिया या देशांची मागणी वाढत आहे. काही ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मनुसार फिलिपिन्ससाठी बुकिंगमध्ये तिप्पट वाढ झाली आहे.

देशांतर्गत पर्यटनालाही मोठी चालना

देशांतर्गत पर्यटनामध्येही मोठी वाढ दिसून येत आहे. ऋषिकेश, लेह, वाराणसी तसेच ईशान्य भारतातील शिलाँग, गुवाहाटी आणि इंफाळसारख्या शहरांसाठी बुकिंग वाढत आहे. ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मच्या आकडेवारीनुसार, हिल स्टेशनसाठी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ३८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर कूर्गसाठी मे महिन्यातील बुकिंग तब्बल ११५ टक्क्यांनी वाढली आहे.

महागाई असूनही प्रवासाची मागणी कायम

विशेष म्हणजे, वाढत्या खर्चानंतरही प्रवासाची मागणी कमी झालेली नाही. ट्रॅव्हल कंपन्यांच्या मते, यंदाच्या उन्हाळी हंगामात अॅडव्हान्स बुकिंग सामान्य काळाच्या तुलनेत २० ते २५ टक्के अधिक आहे. यावरून स्पष्ट होते की, भारतीय ग्राहकांसाठी प्रवास आता केवळ छंद राहिलेला नसून जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग बनत चालला आहे.

Web Title : गर्मी की छुट्टियों में महंगाई की मार; घरेलू, अंतर्राष्ट्रीय उड़ानें महंगी।

Web Summary : जेट ईंधन की बढ़ती लागत और हवाई क्षेत्र की समस्याओं के कारण उड़ान के किराए 40-50% बढ़ गए हैं। यूरोप और अमेरिका के महंगे होने के कारण भारतीय सस्ते दक्षिण पूर्व एशियाई गंतव्यों और घरेलू हिल स्टेशनों की ओर रुख कर रहे हैं। हिल स्टेशनों के लिए बुकिंग में वृद्धि के साथ घरेलू पर्यटन को बढ़ावा मिला है।

Web Title : Summer travel hit by inflation; flight fares soar domestically, internationally.

Web Summary : Soaring jet fuel costs and airspace issues have hiked flight prices by 40-50%. Indians are shifting to cheaper Southeast Asian destinations and domestic hill stations, as Europe and America become pricier. Domestic tourism is boosted, with significant booking increases for hill stations.