ठळक मुद्दे आज ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ हे प्रार्थना गीत रोज हजारो शाळांमध्ये, कार्यालयात गायले जाते.  

‘इतनी शक्ति हमें देना दाता’ या सुप्रसिद्ध प्रार्थना गीताचे गीतकार अभिलाष यांचे कॅन्सरने निधन झाले. काल रात्री त्यांनी अंतिम श्वास घेतला.

अभिलाष हे दीर्घकाळापासून कॅन्सरला झुंज देत होते. मार्च महिन्यांत त्यांच्या पोटातील एका ट्युमरचे आॅपरेशन झाले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. काल रात्रीच गोरेगाव पूर्वच्या शिवधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘इतनी शक्ति हमें देना दाता’ या लोकप्रिय गीताशिवाय सांझ भई घर आजा, आज की रात न जाना, वो जो खत मुहब्बत में, तुम्हारी याद सागर में, संसार एक नदीया, तेरे बिन सूना मेरे मन का मंदिर अशी त्यांची अनेक गाणी लोकप्रिय झाली होती. सुमारे चार दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाणी लिहिलीत. शिवाय चित्रपट व मालिकांचेही लेखन केले. पटकथा-संवाद लेखक म्हणूनही त्यांचे अमूल्य योगदान राहिले. अदालत, धूप छाँव, दुनिया रंग रंगीली, अनुभव, संसार, चित्रहार, रंगोली अशा अनेक लोकप्रिय शोचे लेखन त्यांनी केले.
पटकथा लेखन आणि गीत लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

असे रचले गेले अजरामर ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ ...
1985 साली एऩचंद्रा यांनी ‘अंकुश’ हा सिनेमा बनवायला घेतला. त्यावेळी एऩ चंद्रा स्ट्रगल करत होते. त्यांना चंदू म्हणून ओळखले जात असे. या चित्रपटाला कुलदीप सिंह यांनी संगीत दिले तर अभिलाष यांनी गाणी लिहिली. याच चित्रपटासाठी अभिलाष यांना एक प्रार्थना गीत लिहिण्यास सांगितले गेले. गीतकार अभिलाष कामी लागले़ तब्बल दीड महिना ते रोज एऩ चंद्रासोबत बसत आणि ‘अंकुश’साठीच्या प्रार्थना गीताचा मुखडा लिहिण्याचा प्रयत्न करत. पण एऩ चंद्रा दरवेळी नकार देत. त्यादिवशी अभिलाष यांचा संयम सुटला.

 मला माफ करा़ मी हे गीत लिहू शकत नाही. तुम्ही दुस-याकडून लिहून घ्या, असे म्हणत आणि जोरात डायरी आपटत अभिलाष खोलीतून बाहेर पडले. तसे संगीतकार कुलदीप सिंह त्यांच्यामागे धावत गेले. अरे काय झाले, का रागावलास? असे कुलदीप सिंह अभिलाष यांना म्हणाले. अभिलाष प्रचंड संतापले होते. यांना गाण्याची समज तरी आहे का? आज दीड महिना झाला, माझ्याने हे होणार नाही, असे रागारागात अभिलाष म्हणाले. कुलदीप यांनी आधी अभिलाष यांना शांत केले. तू बरोबर आहेस; पण चल थोडे फिरून येऊ, असे म्हणत त्यांनी अभिलाष यांना आपल्या गाडीत बसवले. ‘यार तुने इतना काम किया है, दाता ने तुझे इतनी शक्ती दी है, पता नहीं तू क्यों ऐसा कर रहा है, तेरे मन का विश्वास क्यों कमजोर पड रहा है...’ असे कुलदीप अभिलाष यांना गाडी चालवत चालवत बोलेल आणि याचक्षणी ‘इतनी शक्ती हमें देना दाता’ची सुंदर रचना अभिलाष यांच्या मनात कोरली गेली. जणू दाता प्रत्यक्षात कुलदीप यांच्या जिव्हेवर बसून त्यांना या प्रार्थनेचे संकेत देत होता. अशारितीने ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ ही सुंदर प्रार्थना गीत लिहून तयार झाले. आज हेच प्रार्थना गीत रोज हजारो शाळांमध्ये, कार्यालयात गायले जाते.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: tni shakti hamen dena daata fame lyricist abhilash expired due to cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.