बिग बी अमिताभ यांच्या बंगल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील तारेतारकांचा ‘जलसा’ पाहून त्या दिवशी प्रत्येकाच्या 'ओठावर डोहाळे पुरवा कोणी तरी येणार येणार गं....” हेच गाणे  सहज रेंगाळू लागले होते. कारण निमित्त थोडं खास होतं. बिग बी अमिताभची सून आणि ज्युनियर बी अर्थात अभिषेकची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘डोहाळे जेवणा’च्या कार्यक्रमासाठी अवघं तारांगण ‘जलसा’वर अवतरलं होतं.


बिग बी अमिताभ यांच्या बच्चन कुटुंबात आता एका ‘तान्हुल्या’ बाळाचा प्रवेश होणार होता. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला माहेराला जाण्याआधी परंपरेनुसार तिच्या डोहाळे जेवणाचा खास कार्यक्रम सासूबाई जया बच्चन यांनी आयोजित केला होता. बच्चन कुटुंबियांचा कार्यक्रम... मग त्यासाठी अवघं तारांगण अवतरणार हे निश्चितच.. झालंही तसंच दुपारी दोन वाजल्यापासून हिंदी चित्रपटसृष्टीतली मंडळी एकामागून एक बिग बीच्या जलसामध्ये दाखल होत होती. 

ऐश-अभिला आशीर्वाद देण्यासाठी जलसावर सायरा बानो, आशा पारेख, डिंपल कपाडिया, सरोज खान, सोनाली बेंद्रे, मान्यता दत्त, गौरी खान, माना शेट्टी, नीतू कपूर, ऋतू नंदा, ऊर्मिला मातोंडकर, नीलम कोठारी, ट्विंकल खन्ना, वैभवी मर्चंट, करण जोहरसह अन्य प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती.


यावेळी उपस्थितांनी ऐश-अभिला आशीर्वाद, शुभेच्छा देत गिफ्टही दिलं. सायरा बानू यांनी ऐशच्या सौंदर्याचे गोडवे गात तिला एक ‘सोन्याचं नाणं’ भेट दिलं. ‘निबुडा निबुडा’, ‘ताल से ताल’ अशा वेगवेगळ्या गाण्यांवर ऐशला थिरकण्याचे धडे देणा-या सरोज खान बॉलिवुडकरांचा जलसा पाहून भारावून गेल्या होत्या. पहिल्यांदाच हिंदी चित्रपटसृष्टीतील इतक्या महिला सेलिब्रेटींना एकत्र पाहिल्याचं त्यांनी अनुभवलं. यावेळी जलसावर जल्लोष करण्यात आला. इतकंच नाहीतर ऐशसुद्धा आई होण्याचा आनंद लपवू शकली नाही. ‘सौंदर्यखणी’ ऐश्वर्या कोडकौतुकात हरखून गेली होती. बॉलिवुडकरांचा हा जलसा तब्बल तीन तासाहून अधिक काळ रंगला.

अभिषेकनंसुद्धा ‘ट्विटर’वरुन शुभाशिर्वाद देणा-यांचे आभार व्यक्त केले होते. “परंपरा, भारतीय संस्कृती आणि इतक्या सा-या महिलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा कामावर परतायचं. पुढल्या महिन्यात येणा-या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आतुर आहोत” अशी प्रतिक्रिया त्यानं ट्विटरवर दिली होती.

 
 


Web Title: Throwback Aishwarya Rai Bachchan Baby Shower Photos Viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.