Suspicious death of celebrity fashion designer Sharbari Dutta, body found in bathroom | सेलिब्रेटी फॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू, बाथरुममध्ये सापडला मृतदेह

सेलिब्रेटी फॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचा संशयास्पद मृत्यू, बाथरुममध्ये सापडला मृतदेह

प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले आहे. कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी त्या मृतावस्थेत आढळून आल्या. बाथरुममध्ये त्यांचा मृतदेह आढळल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. अद्याप त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही.

शरबरी दत्ता कोलकाता येथील ब्रॉड स्ट्रीट येथील निवासस्थानी एकट्याच राहत होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.  कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. दरम्यान त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या अहवालातूनच दत्ता यांच्या निधनाचे नेमके कारण समोर येईल.


'पीटीआय'च्या रिपोर्टनुसार, दत्ता यांचे कुटुंबीय सकाळपासूनच त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. पण, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. शरबरी यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी दु:ख व्यक्त केलं. परमा बॅनर्जी, उज्जयनी मुखर्जी, श्रबोंती चॅटर्जी, रुक्मिमी मोइत्रा, पुजारिन घोष, देवेश चॅटर्जी यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी शरबरी दत्ता यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.

शरबरी दत्ता या सुप्रसिद्ध बंगाली कवी अजित दत्ता यांच्या कन्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या फॅशन डिझायनिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. डिझायनर पंजाबी कुर्ता आणि पुरुषांसाठी रंगीत बंगाली धोतराचा ट्रेंड पहिल्यांदा शरबरी यांनीच फॅशन जगतात आणल्याचे सांगितले जाते. पुरुषांसाठीच्या एथनिक वेअर प्रकारच्या डिझाइन्ससाठी त्यांची वेगळी ओळख होती. शरबरी यांचा मुलगा अमलीन दत्ता हासुद्धा एक फॅशन डिझायनर आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Suspicious death of celebrity fashion designer Sharbari Dutta, body found in bathroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.