Superstar Rajinikanth gets clicked in Mumbai post shoot for AR Murugadoss' Darbar | मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत

मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत

ठळक मुद्देएका फोटोत रजनीकांत गर्दीतून चालत असताना दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोत गर्दीतून वाट काढत ते त्यांच्या गाडीकडे जात असताना आपल्याला दिसत आहेत तर तिसऱ्या फोटोत ते गाडीत बसलेले असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 

रजनीकांत हे दाक्षिणात्य सुपरस्टार असून दक्षिणेतील राज्यांमध्ये त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षक अक्षरशः डोक्यावर घेतात. तिथले लोक देव समजून त्यांची पूजादेखील करतात. त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्याआधी अनेकवेळा त्यांच्या पोस्टर्सना दुधाचा अभिषेकदेखील केला जातो. रजनीकांत यांचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. त्यांचे फॅन्स केवळ भारतात नव्हे तर जगभर आहेत. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. हम, चालबाज यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे. रजनीकांत यांची एक झलक पाहायला मिळावी यासाठी त्यांचे चाहते आतुर असतात.  

रजनीकांत यांना नुकतेच चक्क मुंबईच्या रस्त्यावर पाहाण्यात आले. ते कोणत्या खाजगी कामासाठी नव्हे तर एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईला आले होते. रजनीकांत यांच्या दरबार या चित्रपटाचे चित्रीकरण त्यांनी काही दिवसांपूर्वीच सुरू केले आहे आणि आता या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मुंबईच्या रस्त्यावरून चालताना त्यांना नुकतेच पाहाण्यात आले. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर लीक झाले आहेत. यातील एका फोटोत रजनीकांत गर्दीतून चालत असताना दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोत गर्दीतून वाट काढत ते त्यांच्या गाडीकडे जात असताना आपल्याला दिसत आहेत तर तिसऱ्या फोटोत ते गाडीत बसलेले असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.  

रजनीकांत यांनी या फोटोत हिरव्या रंगाचा शर्ट घातला असून या चित्रपटातील त्यांचा लूक कसा असणार हे या फोटोवरून कळून येत आहे. या चित्रपटात ते केसांचा टोप लावणार नसल्याचे या फोटोंवरून दिसून येत आहे. दरबार या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरुगादॉस करणार असून या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत नयनतारा, निवेदा थॉमस, रवी किशन, कुणाल खेमु, सौरभ शुक्ला या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  

दरबार या चित्रपटात रजनीकांत दुहेरी भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असून या पोलिसाच्या मुलाची भूमिका देखील साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Superstar Rajinikanth gets clicked in Mumbai post shoot for AR Murugadoss' Darbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.