ठळक मुद्देमादाम तुसाँ या संग्रहालयात आत्तापर्यंत अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, शाहरुख खान, हृतिक रोशन, अनुष्का शर्मा अशा अनेक सेलिब्रिटींचे पुतळे ठेवण्यात आले आहेत.

बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खूशी कपूर यांच्यासाठी आजचा दिवस भावूक करणारा ठरला. सिंगापूरमधील जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात श्रीदेवींच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आणि बोनी, जान्हवी व खूशी सगळेच भावूक झालेत. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी कमालीची भावूक झालेली दिसतेय. श्रीदेवींच्या मेणाच्या पुतळ्यासमोर उभी होत, ती त्याकडे एकटक बघत आहे.

श्रीदेवींचा हा मेणाचा पुतळा इतका सुंदर आहे की, एकक्षण जणू साक्षात श्रीदेवी आपल्यासमोर उभ्या आहेत, असाच भास होईल. हा पुतळा पाहिल्यानंतर श्रीदेवींच्या ‘हवा हवाई’ या गाण्याची हटकून आठवण येईल. 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातील हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले होते. याच गाण्याच्या लूकमध्ये श्रीदेवींचा मेणाचा पुतळा साकारण्यात आला आहे.

गत १३ आॅगस्ट रोजी श्रीदेवींचा वाढदिवस होता आणि याच दिवशी त्यांचा मेणाचा पुतळा तयार करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.  श्रीदेवींच्या वाढदिवसानिमित्त मादाम तुसाँ संग्रहालयाने श्रीदेवीच्या मेणाच्या पुतळ्याचा फोटो शेअर केला होता. अर्थात या फोटोमध्ये श्रीदेवीचा पूर्ण लूक दाखवण्यात आला नव्हता. नुकताच पती बोनी कपूर यांनी या पुतळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘श्रीदेवी फक्त माज्याच नाही तर कोट्यावधी चाहत्यांच्या मनात आजही जिवंत आहे. मी मादाम तुसाँ संग्रहालयातील तिचा मेणाचा पुतळा पाहण्यासाठी आतुर आहे’, असे कॅप्शन त्यांनी दिले होते.


मादाम तुसाँ या संग्रहालयात आत्तापर्यंत अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, शाहरुख खान, हृतिक रोशन, अनुष्का शर्मा अशा अनेक सेलिब्रिटींचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. आता या पुतळ्यांमध्ये श्रीदेवींच्या पुतळ्याचीही भर पडली आहे.

Web Title: Sridevi's wax statue unveiled at Madame Tussauds in Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.