'शमशेरा'मधून संजय दत्त प्रेक्षकांना देणार आश्चर्याचा धक्का, दिग्दर्शक करण मल्होत्राचं चाहत्यांसाठी सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 12:50 PM2021-07-24T12:50:25+5:302021-07-24T12:50:53+5:30

करण मल्होत्रा दिग्दर्शित 'शमशेरा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

From 'Shamshera', Sanjay Dutt will surprise the audience, reveals director Karan Malhotra | 'शमशेरा'मधून संजय दत्त प्रेक्षकांना देणार आश्चर्याचा धक्का, दिग्दर्शक करण मल्होत्राचं चाहत्यांसाठी सरप्राईज

'शमशेरा'मधून संजय दत्त प्रेक्षकांना देणार आश्चर्याचा धक्का, दिग्दर्शक करण मल्होत्राचं चाहत्यांसाठी सरप्राईज

Next

फिल्ममेकर करण मल्होत्राने शमशेरा हा बहुप्रतिक्षित सिनेमा दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांसाठी दृश्यात्मक सुंदर अनुभव असणार आहे, असं त्याने सांगितलं. रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्या भूमिका असलेल्या या सिनेमाच्या मिक्सिंगचं काम सध्या करण करतो आहे. हा सिनेमा म्हणजे चित्रपटगृहांमध्ये हिंदी सिनेमा पाहण्याचा एक परिपूर्ण सिनेमॅटिक अनुभव असणार आहे.  


करण मल्होत्राने म्हटले की, "शमशेराच्या मिक्सिंगचं काम पूर्ण करूनच मी वाढदिवस साजरा करेन. हे काम गेल्या काही काळापासून मी फार मनापासून करतोय. तुम्हा सर्वांसोबत शमशेरा शेअर करण्यास मी फारच उत्सुक आहे. एक प्रेक्षक म्हणून मला ज्या कथा पहायला आवडतील त्या एक फिल्ममेकर म्हणून मी सांगू शकतो हे माझं सुदैव आहे आणि शमशेरा ही नक्कीच त्या प्रकारची कथा आहे. हा दृश्यात्मक अनुभव फारच भन्नाट असेल. यात विविध मानवी भावभावना आहेत. वर्षानुवर्षे लोकांना हिंदी सिनेमा पाहण्याचा परिपूर्ण अनुभव खऱ्या अर्थाने जिथे घेतला त्या मोठ्या पडद्यासाठीचीच ही कथा आहे."


या अ‍ॅक्शन, मनोरंजक चित्रपटासाठी अगदी योग्य टीम मिळाल्याने करण स्वत:ला नशीबवान समजतो. त्याच्या मते रणबीर कपूर 'जनरेशन डिफायनिंग अ‍ॅक्टर' आहे. तो म्हणाला, "आदित्य चोप्रा यांच्यासारखा उत्तम निर्माता आणि असे कामात झोकून देणारे कलाकार, क्रू शमशेरासाठी मिळणं हे माझं सुदैव आहे. हे सगळेच प्रत्येक क्षणी माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेत. रणबीर कपूर हा जनरेशन डिफायनिंग अ‍ॅक्टर आहे आणि शमशेरामध्ये त्याने अगदी उत्तम काम केलंय. वाणी कपूरने या सिनेमात त्याची प्रेरणा म्हणून त्याला उत्तम साथ दिली आहे. संजय दत्तच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे."


करणचा विश्वास आहे की शमशेरामध्ये भारतभरातील हिंदी सिनेमाची जी ओळख आहे ते सर्व काही आहे आणि महासंकटाच्या काळानंतर मोठ्या पडद्यावर ज्यांना चांगला सिनेमा पहायचा आहे त्यांना हा सिनेमा आकर्षित करेल. करण म्हणाला, "मी अस्सल हिंदी सिनेमा पाहत मोठा झालोय आणि चित्रपटगृहांमध्ये प्रत्येक जण आनंद घेऊ शकेल असा खऱ्या अर्थाने हिंदी सिनेमा मला बनवायचा होता. प्रत्येकाला आवडेल असा सिनेमा आम्ही बनवू शकलोय, असा मला विश्वास वाटतो. देशातील कोविड-19ची स्थिती थोडी सुधारेल याची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय आणि त्यानंतर शक्य तितक्या भव्य पद्धतीने आम्ही शमशेरा प्रदर्शित करणार आहोत."

Web Title: From 'Shamshera', Sanjay Dutt will surprise the audience, reveals director Karan Malhotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app