ठळक मुद्देशाहिदच्या घरात सध्या इंटेरिअरचे काम सुरू असून हे काम झाल्यानंतर या घरात ते शिफ्ट होणार असल्याचे म्हटले जात आहे. या घराची किंमत जवळजवळ 56 कोटी रुपये आहे. 

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या कबीर सिंगने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने भारतातच नव्हे तर जगभरात खूप चांगले कलेक्शन केले आहे. शाहिद कपूरच्या करिअरमध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला असून या चित्रपटाच्या यशानंतर शाहिदला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. 

कबीर सिंग या चित्रपटाच्या यशामुळे शाहिद कपूर सध्या चांगलाच खूश आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आता शाहिद एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या शाहिदने आता मुंबईत भलेमोठे घर घेतले आहे आणि तो लवकरच आपल्या कुटुंबियांसोबत या घरात शिफ्ट होणार आहे.

शाहिदने मुंबईतील वरळी या ठिकाणी 8000 स्केवअर फूटचे घर घेतले असून तो लवकरच त्याची पत्नी मीरा रजपूत कपूर आणि मुलं मीशा आणि झेन सोबत या घरात शिफ्ट होणार आहेत. शाहिदने काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत तो लवकरच मोठे घर घेणार आहे याविषयी कल्पना दिली होती. त्याने सांगितले होते की, आमच्या दोन मुलांच्या जन्मानंतर आमचे कुटुंब आता मोठे झाले आहे. त्यामुळे आता लवकरच मी, मीरा आणि आमची मुले एका नव्या आणि मोठ्या घरात शिफ्ट होणार आहोत. या वर्षांच्या अखेरीपर्यंत आम्ही शिफ्ट व्हायचा विचार करत आहोत.

शाहिदने घर घेणार याची कल्पना दिली असली तरी घर कुठे घेणार यावर मौन पाळणेच पसंत केले होते. शाहिदच्या घरात सध्या इंटेरिअरचे काम सुरू असून हे काम झाल्यानंतर या घरात ते शिफ्ट होणार असल्याचे म्हटले जात आहे. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार या घराची किंमत जवळजवळ 56 कोटी रुपये आहे. 

शाहिद कपूरने इश्क विश्क या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटामुळे त्याला चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले. त्याच्या फॅन्समध्ये देखील महिला चाहत्यांची संख्या ही अधिक आहे. शाहिदने आज बॉलिवूडमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. 

Web Title: Shahid Kapoor, Mira Rajput May Move into Their Rs 56-Crore Duplex Apartment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.