ठळक मुद्देसैफ अली खान यांची मी खूप वर्षांपासून चाहती आहे. पहिल्यांदाच मी त्यांच्यासोबत काम करत होते. ते खूप मनमिळावू स्वभावाचे आहेत.

सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन नुकताच नेटफ्लिक्सवर लाँच झाला असून या सिझनला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. या बहुचर्चित वेबसीरिजची प्रेक्षक गेल्या कित्येक महिन्यांपासून वाट पाहात होते. या वेबसिरिजच्या दुसऱ्या पर्वात सैफ अली खानच्या सोबत अभिनेत्री स्मिता तांबेही झळकली आहे.

न्यू-क्लिअर बॉम्बच्या साखळीला शोधण्यामध्ये सिनिअर इन्स्पेक्टर सरताज सिंगला मदत करणारी सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट रमाच्या भूमिकेत स्मिता तांबे या सिरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

स्मिता तांबेच्या या भूमिकेबद्दल सध्या तिचे चांगलेच कौतुक होत आहे. तिचा सेक्रेड गेम्सचा सहकलाकार सैफ अली खानने दिलेली कॉम्पलिमेन्ट तिच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे.

स्मिता याविषयी सांगते, “सैफ अली खान यांची मी खूप वर्षांपासून चाहती आहे. पहिल्यांदाच मी त्यांच्यासोबत काम करत होते. ते खूप मनमिळावू स्वभावाचे आहेत. सीन सुरू नसताना ते खूप चेष्टा-मस्करी करत असतात. पण एकदा का सीन सुरू झाला  की, मग भूमिका वठवताना ते एकदम गंभीर होतात. चित्रीकरणाच्या वेळी माझे काम पाहून तू खूप इंटेन्स एक्टरेस आहेस ही त्यांनी दिलेली शाबासकी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.”

स्मिता साकारत असलेली ‘रमा’, मुंबईतल्या शिवडी मध्ये कुटुंबासमवेत राहणारी, मुळची विदर्भातली दाखवली आहे. आपल्या कामाबद्दल प्रचंड निष्ठावान असलेली ही रमा असून अहोरात्र झोकून देऊन काम करणारी आहे. २६/११ च्या हल्ल्यानंतर देशासाठी काहीतरी करून दाखवण्यासाठी ती पोलिसात भरती होते. मुंबईवर हल्ला करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांचे गुप्त संदेश ‘डिकोड’ करताना ती दाखवली आहे.

नीरज घायवान या दिग्दर्शकासोबतही स्मिताने पहिल्यांदाच काम केले. ती सांगते, “नीरज घायवान खूप शांत दिग्दर्शक आहे. त्याची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. अभिनेत्याला त्याच्या भूमिकेविषयी किंवा एखाद्या सीनविषयी समजावताना खूप सारी माहिती देऊन त्याला गोंधळून टाकत नाही. गरजेची असलेलीच माहिती देऊन त्यावर अभिनेत्यालाही काम करून देण्याची मोकळीक देतो. त्यामुळे आपल्या कामावर आपली वेगळी छाप उमटते.”

Web Title: Saif ali khan give compliment to his sacred games season 2 costar Smita Tambe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.