sacred games2 bjp delhi spokesperson tajinder bagga files case against anurag kashyap | अनुराग कश्यप नव्या वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’मधील दृश्यामुळे भाजपाने दाखल केला गुन्हा

अनुराग कश्यप नव्या वादात, ‘सेक्रेड गेम्स 2’मधील दृश्यामुळे भाजपाने दाखल केला गुन्हा

ठळक मुद्दे सध्या अनुराग त्याच्या ‘सांड की आंख’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा नव्या वादात अडकण्याची चिन्हे आहेत. ‘सेक्रेड गेम्स 2’ या वेबसीरिजमधील एका सीनमुळे अनुरागविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली भाजप प्रवक्ते तेजिंदर बग्गा यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये अभिनेता सैफ अली खान याने शिख तरूणाची भूमिका साकारली आहे. एका सीनमध्ये तो स्वत:च्या हातातले कडे काढून समुद्रात फेकतो. बग्गा यांनी या सीनवर आक्षेप नोंदवला आहे.हातातील कडं ही शिख धर्मातील एक पवित्र व अविभाज्य वस्तू आहे. ती अपार आदर व श्रद्धेने परिधान केली जाते. ‘सेक्रेड गेम्स 2’च्या दिग्दर्शकाने या कड्याचा आणि पर्यायाने शिख समुदायाचा अपमान केल्याचे बग्गा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दिग्दर्शकाने शिख समुदायाच्या भावना भडकवण्यासाठी आणि समाजातील धार्मिक गटांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक हा सीन टाकला, असेही बग्गा यांचा दावा आहे. या प्रकरणी त्यांनी अनुराग कश्यपविरोधात भांदविच्या कलम 295 ए, 153 ए,504,505 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

विशेष म्हणजे, यापूर्वी अकाली दलाचे खासदार मनजिंदरसिंग सिरसा यांनी नेटफ्लिक्सची ही वेबसीरिज साईटवरून काढून टाकण्याची धमकी दिली होती.
‘सेक्रेड गेम्स 2’चा दिग्दर्शक अनुराग कश्यप गेल्या काही दिवसांपासून सतत वादात आहे. गत 10  ऑगस्टला त्याने स्वत:चे टिष्ट्वटर अकाऊंट डिलीट केले. आई-वडिल आणि मुलीला सोशल मीडियावर सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने त्याने हे पाऊल उचलले होते. 
अलीकडे अनुरागने जम्मू काश्मीरातील कलम 370 हटवण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. कलम 370 हटवण्याची पद्धत चुकीची आणि दहशत निर्माण करणारी असल्याचे त्याने म्हटले होते. यावरून तो प्रचंड ट्रोल झाला होता. मॉब लिचिंगविरूद्ध घेतलेल्या मोदीविरोधी भूमिकेमुळेही त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते.
 सध्या अनुराग त्याच्या ‘सांड की आंख’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिका साकारणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sacred games2 bjp delhi spokesperson tajinder bagga files case against anurag kashyap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.