ठळक मुद्देमी चित्रपट निवडताना सगळ्यात पहिल्यांदा कथेला प्राधान्य देते. तसेच दिग्दर्शक कोण आहे याविषयी विचारते. कारण चित्रपटाला यश मिळाल्यानंतर कलाकारांना त्याचे श्रेय देण्यात येते. पण माझ्यामते तरी चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असते.

प्रेक्षकांची लाडकी पिग्गी चोप्स म्हणजेच प्रियंका चोप्रा द स्काय इज पिंक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. तिच्या या कमबॅकबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...


द स्काय इज पिंक या चित्रपटाद्वारेच कमबॅक करण्याचा विचार का केलास आणि या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
द स्काय इज पिंक हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाची कथा ही खरी असून एका कुटुंबाच्या आयुष्यातील चढ-उतार प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. आपल्याला प्रत्येकाला मृत्यू या गोष्टीला सामोरे जायचे आहे. आपण प्रत्येकाने कधी ना कधी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे. रडत न बसता आपल्याला मिळालेले आयुष्य कशाप्रकारे साजरे करायचे हा संदेश हा चित्रपट देतो. त्यामुळे या चित्रपटाचा विषय खूपच वेगळा आणि खास आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी, माझे कुटुंब पूर्णपणे कोलमडले होते. आमच्यासाठी तो खूप कठीण काळ होता. पण या चित्रपटामुळे मला या दुःखातून बाहेर पडायला मदत झाली. दुःख करत बसण्यापेक्षा त्या व्यक्तीसोबतच्या सगळ्या आठवणी जतन करायच्या असे या चित्रपटाने मला शिकवले.

फरहान अख्तरसोबत तू याआधी देखील काम केले आहेस, त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
2005 मध्ये मी फरहानने निर्मिती केलेल्या डॉन या चित्रपटात काम केले होते आणि आता मी त्याच्या चित्रपटाची निर्माती आहे. आम्ही दिल धडकने दो या चित्रपटातदेखील एकत्र काम केले होते. गेल्या काही वर्षांत खूप काही बदलले आहे. पण आमची मैत्री कायम आहे. तो एक खूप चांगला अभिनेता असून त्याच्यासोबत काम करायला नेहमीच मजा येते.

तुला आज एक निर्माती म्हणून देखील यश मिळाले आहे. चित्रपटाची निर्मिती करताना कथेची निवड कशाप्रकारे करतेस?
माझ्यासाठी चित्रपटाची संकल्पना ही अतिशय महत्त्वाची असते. पण तरीही मी चित्रपटाची निर्मिती करताना जास्त विचार करत नाही. मला स्वतःला चित्रपट पाहायला अतिशय आवडतात. त्यामुळे माझ्या हृदयाला स्पर्श होईल अशी कथा असेल तर मी चित्रपटाची निर्मिती करायला लगेचच होकार देते. चित्रपटाची निर्मिती करताना मी प्रेक्षकांच्या भूमिकेत जाऊन हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल का याचा विचार सगळ्यात पहिल्यांदा करते. 

तू आज बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले आहेस, तू इतक्या वर्षांनी आता चित्रपट निवडताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतेस?
कोणताही प्रेक्षक केवळ एखाद्या कलाकारासाठी चित्रपट पाहायला येत नाही. स्टारमुळे चित्रपट चालणे ही गोष्ट आता बदलली आहे. त्यामुळे कथा चांगली नसेल तर दिग्गजांचे चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर आपटत आहेत. प्रेक्षक महागाचे तिकीट खरेदी करत असल्याने त्यांना चांगले चित्रपटच पाहायचे आहेत. मी चित्रपट निवडताना सगळ्यात पहिल्यांदा कथेला प्राधान्य देते. तसेच दिग्दर्शक कोण आहे याविषयी विचारते. कारण चित्रपटाला यश मिळाल्यानंतर कलाकारांना त्याचे श्रेय देण्यात येते. पण माझ्यामते तरी चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: priyanka chopra said while promoting the sky is pink director is most important element in film making

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.