ठळक मुद्देटेरेन्स सांगतो, “जेव्हा मी एरोबिक्स आणि फिटनेस शिकवत असे, तेव्हा माझ्या वर्गात बर्‍याच प्रसिद्ध व्यक्ती होत्या. पण त्यातील सर्वांकडे काही ना काही बहाणे असायचे. पण मलायका मात्र अत्यंत वक्तशीर विद्यार्थिनी होती.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील डान्स रिअ‍ॅलिटी शो- इंडियाज बेस्ट डान्सर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला असून हा कार्यक्रम 29 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत मलायका अरोरा, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस दिसणार आहेत तर सूत्रसंचालनाची जबाबदारी भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया सांभाळणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी नुकतीच या सगळ्यांनी द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावली.

मलायका अरोरा आणि टेरेन्स 20 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. मलायका त्याच्या अ‍ॅकॅडमीत डान्स शिकत होती आणि आज त्याच्यासोबत बसून ती एका डान्स शोचे परीक्षण करत आहे. मलायका स्टुडंट म्हणून कशी होती असे कपिलने टेरेन्सला विचारले असता त्याने सांगितले की, “जेव्हा मी एरोबिक्स आणि फिटनेस शिकवत असे, तेव्हा माझ्या वर्गात बर्‍याच प्रसिद्ध व्यक्ती होत्या. पण त्यातील सर्वांकडे काही ना काही बहाणे असायचे, जसे की, ‘मी अमुक वेळी येईन’, ‘मला थोडा उशीर होईल’ वगैरे. पण मलायका मात्र अत्यंत वक्तशीर विद्यार्थिनी होती. ती नेहमी वेळेच्या आधीच हजर असायची आणि आपले काम अत्यंत गांभीर्याने करायची. आपल्या व्यायामावर तिचा संपूर्ण फोकस असायचा.”

इंडियाज बेस्ट डान्सर 15-30 या वयोगटातील नृत्याच्या वेडाने झपाटलेल्या प्रतिभावंतांना मंच प्रदान करत आहे. अनेक राज्यांमधील शेकडो स्पर्धकांनी या कार्यक्रमासाठी ऑडिशन्स दिल्या असून त्यांना आपल्या सर्वोत्कृष्ट तीन डान्स मूव्ह्ज दाखवून परीक्षकांना प्रभावित करून स्पर्धेत पुढे जायचे आहे. इंडियाज बेस्ट डान्सर हा कार्यक्रम शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Malaika was the most punctual student, revealed Terence Lewis on The Kapil Sharma Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.