labourer flooded with calls on phone over actor sushant singh rajput death | सुशांतच्या आत्महत्येनंतर ‘हा’ मजुर इतका वैतागला की पोलिस ठाण्यात पोहोचला, जाणून घ्या काय आहे संबंध

सुशांतच्या आत्महत्येनंतर ‘हा’ मजुर इतका वैतागला की पोलिस ठाण्यात पोहोचला, जाणून घ्या काय आहे संबंध

ठळक मुद्देफेसबुकवरच्या अंकिताच्या या फॅन फेजला 40 हजार लोक फॉलो करत आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर एक 20 वर्षांचा पेशाने मजूर असलेला तरूण चांगलाच वैतागला आहे.  सुशांतच्या आत्महत्येनंतर या मजुराच्या फोनवर शेकडो कॉल्स येणे सुरु झाले. या कॉल्समुळे तो इतका त्रस्त झाला की, त्याला पोलिसात तक्रार दाखल करावी लागली. आता सुशांत आणि या मजुराचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याला कारण आहे, एक फेसबुक पेज. होय, सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजमुळे या मजुराला नाहक त्रास सहन करावा लागला.

हा मजूर मध्यप्रदेशच्या इंदूरचा आहे. सततच्या कॉल्समुळे वैतागून त्याने पोलिसात तक्रार दाखल केली. सायबर सेलने या प्रकरणाचा तपास केला, तेव्हा कुठे त्याचा व सुशांतच्या आत्महत्येचा काय संबंध याचा खुलासा झाला. तर अंकिता लोखंडेच्या नावाचे एक फेसबुक पेज आहे. या फेसबुक फॅन पेजवरील ‘about’ सेक्शनमध्ये कुणी तरी या मजुराचा फोन नंबर टाकला. त्यामुळे अनेकांनी तो अंकिताचा नंबर म्हणून त्यावर फोन करणे सुरु केले.


 
सुशांतच्या आत्महत्येनंतर लगेच या मजुराचा फोन खणखणू लागला. काही लोकांनी त्याचा आवाज ऐकून रॉन्ग नंबर लागला म्हणून फोन कट केला. पण अनेकांनी रॉन्ग नंबर आहे हे कळूनही या मजुराचा पिच्छा पुरवला. अनेकांनी फोन कुणाचा, काय हे जाणून घेण्याची तसदी न देता थेट या मजुराला शिव्या देणे सुरु केले, काही जण संतापाच्या भरात वाट्टेल ते बोलले. या प्रकारामुळे हा मजूर इतका त्रस्त झाला की, त्याने थेट पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.
 फेसबुकवरच्या अंकिताच्या या फॅन फेजला 40 हजार लोक फॉलो करत आहेत. आता पोलिस या फेक पेजला ऑपरेट करणा-या व्यक्तिचा शोध घेत आहेत.
 सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय. अनेकांनी सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी सोशल मीडियावर मोहिम उघडली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: labourer flooded with calls on phone over actor sushant singh rajput death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.