It was suggested by Sanjay Dutt the role of Maharani in Sadak, read this interesting thing s | अशी सुचली होती संजय दत्तला 'सडक'मधील महाराणीची भूमिका, वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा

अशी सुचली होती संजय दत्तला 'सडक'मधील महाराणीची भूमिका, वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा

बॉलिवूडमध्‍ये खलनायक हे नायकांप्रमाणेच महत्‍त्‍वाचे असतात. हे खलनायक हिरोंना कठीण टास्‍क देतात. भारतीय सिनेमामध्‍ये सर्वोत्‍तम खलनायक भूमिका दिसल्‍या आहेत, जसे गब्‍बर सिंग, मोगँम्‍बो, डॉ. डँग आणि शाकाल, ज्‍यांचा आपण तिरस्‍कार केला असला तरी त्‍या व्‍यक्तिरेखांनी आपल्‍या मनांवर छाप पाडली आहे. असाच एक खलनायक आहे 'सडक' चित्रपटातील 'महाराणी'. दिग्‍गज अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांनी ही भूमिका साकारली होती. 

सदाशिव अमरापूरकर यांच्‍या ६९व्‍या वाढदिवसानिमित्‍त सोनी मॅक्‍सवरील शो 'लाइट्स कॅमेरा अ‍ॅण्‍ड किस्‍से' त्‍यांच्‍या या पुरस्‍कार विजेत्‍या खलनायकी भूमिकेला उजाळा देत महाराणी भूमिकेमागील संकल्‍पनेबाबत सांगितले. 'महाराणी' भूमिका सुचवली चित्रपटाचा हिरो संजय दत्‍त यांनी. सदाशिव अमरापूरवर यांनी पडद्यावर ही भूमिका सुरेखरित्‍या साकारली असली, तरी ही भूमिका संजय दत्‍तची संकल्‍पना होती आणि त्‍यानेच या भूमिकेच्‍या निर्मितीसाठी प्रेरित देखील केले होते. 


महेश भट्ट यांना चित्रपटातील मुख्‍य नायकाची भूमिका संजय दत्‍तला द्यायची होती आणि म्‍हणूनच ते पटकथा घेऊन त्‍याच्‍याकडे गेले. चित्रपटाची पटकथा ऐकल्‍यानंतर संजय दत्‍तला त्‍याच्‍या मनामध्‍ये खोलवर रूतलेल्‍या एका वास्‍तविक जीवनातील अनुभवाची आठवण झाली. मुंबईतील झोपडपट्टयांना भेट देत असताना त्‍याला एक पुरूष दिसला. त्‍या पुरूषाने महिलेप्रमाणे पेहराव केला होता आणि तो झोपडपट्टीतील प्रत्‍येकावर बॉसप्रमाणे हुकूमत गाजवत होता. 


संजय दत्‍तने हीच भूमिका व व्‍यक्तिमत्‍त्‍व असलेला चित्रपटातील खलनायक निर्माण करण्‍याचा विचार मांडला. कारण त्‍याने ऐकलेल्‍या पटकथेसाठी ही अगदी योग्‍य भूमिका होती. दुसरीकडे महेश भट्ट यांना भूमिकेचे व्‍यक्तिचित्रण आवडले आणि त्‍यांनी त्‍या पटकथेमध्‍ये या भूमिकेची भर करण्‍याचे मान्‍य केले. यातूनच बॉलिवूडचा सर्वात द्वेष वाटणारा खलनायक 'महाराणी' ही भूमिका सर्वांसमोर सादर करण्‍यात आली. महाराणी हा एक दुष्‍ट किन्‍नर होता आणि तो वेश्‍याव्‍यवसाय चालवत होता.
ही भूमिका रोचक व वेगळी होती. पण पडद्यावर 'महाराणी' भूमिका साकारण्‍यासाठी योग्‍य व्‍यक्तिचे कास्टिंग करण्‍यामध्‍ये समस्‍या येत होती. येथूनच योग्‍य व्‍यक्‍तीची निवड करण्‍याचा प्रवास सुरू झाला आणि अखेर या भूमिकेसाठी सदाशिव अमरापूरकर यांची निवड करण्‍यात आली. महेश भट्टने गोविंद निहलानीचा गाजलेला चित्रपट 'अर्धसत्‍य'मधील सदाशिव यांचा अभिनय पाहून या भूमिकेसाठी त्‍यांची निवड करण्‍याचे ठरवले. 
सदाशिव अमरापूरकर यांना भूमिकेसाठी विचारले असता त्‍यांनी अमरिश पुरी व अमजद खान या दिग्‍गज खलनायकांच्‍या पंगतीत स्‍थान मिळण्‍याची एक सुवर्णसंधी म्‍हणून या भूमिकेकडे पाहिले. त्‍यांनी संधीचे सोने करत जीवनातील सर्वोत्‍तम अभिनय सादर केला. 'महाराणी' भूमिकेतील जिवतंपणा त्‍यांनी समोर आणत त्‍या भूमिकेला अजरामर केले. ही भूमिका व अभिनय पाहून फिल्‍मफेअरने त्‍याच वर्षामध्‍ये 'बेस्‍ट अ‍ॅक्‍टर इन निगेटिव्‍ह रोल' हा नवीन पुरस्‍कार सुरु केला आणि १९९१ मध्‍ये सदाशिव अमरापूरकर यांना या पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आले. 

Web Title: It was suggested by Sanjay Dutt the role of Maharani in Sadak, read this interesting thing s

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.