Internet slams IIFA for stealing Sridevi tribute from a fan | IIFA 2018: आयफाने चोरीचा व्हिडिओ दाखवून श्रीदेवींना वाहिली श्रद्धांजली?
IIFA 2018: आयफाने चोरीचा व्हिडिओ दाखवून श्रीदेवींना वाहिली श्रद्धांजली?

सोशल मीडियावर सध्या श्रीदेवींचा एक व्हिडिओ व्हायरल होतोयं. आयफा2018 सोहळ्यात हा व्हिडिओ दाखवला गेला होता. यंदा जूनच्या अखेरच्या आठवड्यांत आयफा सोहळ्याचे आयोजन केले होते. नुकताच हा सोहळा टीव्हीवर टेलिकास्ट करण्यात आला. या रंगारंग सोहळ्यात श्रीदेवी यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली गेली. काही मिनिटांच्या या व्हिडिओत श्रीदेवींच्या फिल्मी करिअरची झलक आणि त्यांच्या काही आठवणी दाखवण्यात आल्यात. साहजिकचं हा व्हिडिओ पाहून सोहळ्याला हजर असलेली प्रत्येक सेलिब्रिटी अन् प्रेक्षक भावूक झाला. याच व्हिडिओशी संबंधित एक वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे. होय, आयफाने दाखवलेला श्रीदेवींचा हा व्हिडिओ आपला असून आयफाने तो चोरला, असा दावा श्रीदेवींच्या एका चाहतीने केला आहे.

 सबा आरिफ नावाच्या या चाहतीने Kaleidoscopiaया यु-ट्यूब चॅनलवर श्रीदेवींचा हा ७ मिनिटे १ सेकंदाचा व्हिडिओ २५ मार्च २०१८ रोजी अपलोड केला होता. या व्हिडिओची लिंक फेसबुकवर पोस्ट करत, सबाने आयफाने तिचाहा व्हिडिओ चोरल्याचा आरोप केला आहे. 

आयफाने दाखवलेला व्हिडिओ

सबाने अपलोड केलेला आणि आयफाने दाखवलेले दोन्ही व्हिडिओ अगदी सारखे आहेत. केवळ या व्हिडिओतील पार्श्वसंगीत बदललेले आहेत. सबाने फेसबुकवर याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. ‘हे वेदनादायी आहे़ तुमच्या कामाला, कष्टाला दुसरेचं कुणी आपले नाव देते, तेव्हा आपण ठगवलो गेल्याचे जाणवते. काल रात्री मी टीव्हीसमोर बसले. समोर आयफा सोहळ्याचे प्रसारण सुरू होते. टीव्हीवरचा हा सोहळा पाहताना मला अचानक धक्का बसला. कारण मी बनवलेला एक अख्खा व्हिडिओ माझ्या परवानगीविना यात दाखवला गेला होता. इंडस्ट्रीतील अनेक लोक हा व्हिडिओ पाहून रडू लागलेत. या व्हिडिओचे क्रेडिट मला दिले गेले असते तर ती माझ्या करिअरमधील सर्वात मोठी उपलब्धी ठरली असती. माझा व्हिडिओ चोरण्यासाठी धन्यवाद,’असे तिने लिहिले आहे. ही पोस्ट व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी आयफाच्या आयोजकांना फैलावर घेतले. मॉडेल व अभिनेत्री सोफी चौधरीनेही ट्विट केले़ हे खरे असेल तर धक्कादायक आहे. तुला क्रेडिट मिळेल, अशी आशा करते, असे ट्विट तिने केले.

 


Web Title: Internet slams IIFA for stealing Sridevi tribute from a fan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.