Doctor G Movie Review : आयुष्मान खुरानाचा 'डॅाक्टर जी' पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 04:23 PM2022-10-14T16:23:51+5:302022-10-14T16:24:18+5:30

Doctor G Movie Review : जाणून घ्या कसा आहे आयुष्मान खुराना, रकुलप्रीत सिंगचा 'डॅाक्टर जी' सिनेमा.

Doctor G Movie Review :Ayushmann Khurrana starr Doctor G Movie Review | Doctor G Movie Review : आयुष्मान खुरानाचा 'डॅाक्टर जी' पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू

Doctor G Movie Review : आयुष्मान खुरानाचा 'डॅाक्टर जी' पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू

googlenewsNext

कलाकार : आयुष्मान खुराना, रकुलप्रीत सिंह, शेफाली शाह, शीबा चड्ढा
दिग्दर्शक : अनुभूती कश्यप
निर्माते : जंगली पिक्चर्स
शैली : मेडीकल कॅम्पस कॉमेडी
कालावधी : दोन तास एक मिनिट
दर्जा : तीन स्टार 
चित्रपटाचे परीक्षण : संजय घावरे

डॅाक्टर आणि आजाराशी निगडीत आजवर बरेच चित्रपट आले आहेत, पण हा चित्रपट डॅाक्टरांचं भावविश्व उलगडणारा आहे. बऱ्याचदा डॅाक्टरांना आपल्या मनाविरुद्ध एखाद्या विभागात रुजू व्हावं लागतं. त्याचा परिणाम त्यांच्या प्रोफेशनवर आणि वैयक्तीक जीवनावर कसा होतो त्याचं दर्शन दिग्दर्शक अनुभूती कश्यप यांनी घडवलं आहे. आयुष्मान खुरानाच्या चित्रपटात नेहमी काहीतरी नावीन्यपूर्ण असतं. हा चित्रपटही त्याला अपवाद नाही.

कथानक : आपल्या दूरच्या भावाकडून प्रेरीत होऊन हाडांचा डॅाक्टर बनण्याची इच्छा असणाऱ्या डॉ. उदय गुप्ताची ही स्टोरी आहे. हाडांच्या डॅाक्टरची एकही सीट रिकामी नसल्यानं आणि आईसोबत राहता यावं यासाठी उदय स्त्रीरोग तज्ज्ञ विभागात रुजू होतो. तिथं त्याची भेट डॉ. फातिमा सिद्दीकीसोबत होते. मुलींच्या विभागात एक मुलगा आल्यानं त्याला चढावा समजून सुरुवातीला उदयसोबत रॅगिंग केलं जातं. उदयसुद्धा पुढल्या वर्षी हाडांच्या डॅाक्टरसाठी ट्राय करण्याच्या उद्देशानं मुकाटपणे सारं सहन करत कसंतरी वर्ष ढकलण्याच्या प्रयत्नात असतो, पण त्या विभागाच्या मुख्य डॅा. नंदिनी श्रीवास्तव त्याच्या डोळ्यांत अंजन घालण्याचं काम करतात. त्यानंतर उदयच्या हातूनही काही सत्कर्म घडतात. कित्येकदा त्याची किंमतही त्याला मोजावी लागते.

लेखन-दिग्दर्शन : एखाद्या पुरुषानं स्त्रीरोग तज्ज्ञ का होऊ नये? डॅाक्टर हा डॅाक्टर असतो. त्यात स्त्री-पुरुष असा भेदभाव नसतो या सुरेख वनलाईनवर या चित्रपटाची कथा आधारलेली आहे. पटकथेची मांडणी अत्यंत साध्या पद्धतीनं करण्यात आली असून दिग्दर्शकानंही तशीच ट्रीटमेंट दिली आहे. यात वैद्यकीय क्षेत्रातील काही नियमांवर प्रकाशझोतही टाकण्यात आला आहे. डॅाक्टरांनी योग्य काळजी घेतली तर ते बदनामीपासून वाचू शकतात आणि वेळप्रसंगी कायद्याची चौकट मोडून रुग्णाचा जीव वाचवला तर देवापेक्षाही महान बनू शकतात हा विचारही यात आहे. डॅाक्टरांच्या वैयक्तीक जीवनावरही प्रकाश टाकताना मैत्रीचा नवा अँगलही जोडला आहे. टायटल डॅाक्टर जी असल्यानं इतर मुद्द्यांना हात घालण्यापेक्षा केवळ डॅाक्टरी पेशाशी निगडीत असलेल्या आणखी काही मुद्द्यांचा बारकाईने विचार केला गेला असता तर चित्रपट आणखी प्रभावी झाला असता. वातावरणनिर्मिती, कॅास्च्युम, कॅमेरावर्क या गोष्टीही चांगल्या आहेत.

अभिनय : आयुष्मान खुरानानने डॉक्टर उदयच्या भूमिकेतील विविध छटा मोठ्या कुशलतेने सादर केल्या आहेत. रकुल प्रीत सिंगने साकारलेली मुख्य व्यक्तिरेखाही सुरेख झाली आहे. या सर्वांपेक्षा शेफाली शाहने साकारलेल्या डॉक्टर समरणीय झाल्या आहेत. शिबा चढढा यांनी रंगवलेली आईही एक वेगळा संदेश देणारी आहे.

सकारात्मक बाजू : संकल्पना, दिग्दर्शन, अभिनय, वातावरण, सादरीकरण
नकारात्मक बाजू : एकाच सिनेमात बरेच मुद्दे सादर करण्याचा प्रयत्न
थोडक्यात : डॉक्टरांच्या जीवनातील वेगळे पैलू दाखवणारा हा सिनेमा त्यांची बाजू समजून घेण्यासाठी एकदा पहायला हवा.

Web Title: Doctor G Movie Review :Ayushmann Khurrana starr Doctor G Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.