ajay devgn starring maidaan film first teaser poster released | Teaser Poster : ‘तान्हाजी’ने रचला इतिहास; आता अजय देवगण गाजवणार ‘मैदान’ 
Teaser Poster : ‘तान्हाजी’ने रचला इतिहास; आता अजय देवगण गाजवणार ‘मैदान’ 

ठळक मुद्देहा सिनेमा येत्या 27 नोव्हेंबरला चित्रपटगृहांत झळकणार आहे. 

अभिनेता अजय देवगनची १०० वी कलाकृती असलेल्या ‘तान्हाजी’ने बॉक्स ऑफिसवर कमाल केलीय. अद्यापही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरु आहे. ‘तान्हाजी’मुळे अजयच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झालेली दिसून येतेय. साहजिकच ‘तान्हाजी’नंतर अजय कुठला नवा सिनेमा घेऊन येणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. तर आता अजय ‘मैदान’ गाजवताना दिसणार आहे. होय, अजयचा ‘मैदान’ हा सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आजच या चित्रपटाचे पहिले टीजर पोस्टर रिलीज झाले.


या पोस्टरमध्ये कुणाचाही चेहरा दिसत नाही. फक्त ते मैदानावर फुटबॉल खेळताना दिसतात. सर्व खेळाडूंचे पाय चिखलाने माखलेले आहेत. झी बॅनरचा हा सिनेमा बोनी कपूर प्रोड्यूस करताहेत. यात अजय देवगणशिवाय प्रियामणि, गजराव राव, बोमन इराणी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अमित रवीन्द्रनाथ शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा येत्या 27 नोव्हेंबरला चित्रपटगृहांत झळकणार आहे. 


या चित्रपटात अजय देवगण फुटबॉल कोच सैयद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारेल. रहीम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय फुटबॉल संघाने १९५६ च्या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपर्यंत बाजी मारली होती. भारतीय फुटबॉल संघाचा सुवर्ण काळ म्हणवल्या जाणा-या १९५२ ते १९६२ हा १० वर्षांचा प्रवास या चित्रपटात रेखाटला जाईल.
या नव्या वर्षांत प्रदर्शित होणारा ‘मैदान’ हा अजयचा हा दुसरा सिनेमा असेल. गत 10 जानेवारीला अजयचा ‘तान्हाजी’ रिलीज झाला होता. या चित्रपटाने आत्तापर्यंत 228.95 कोटींचा बिझनेस केला आहे. आता अजय ‘मैदान’ कसे गाजवतो, ते बघूच.

 

Web Title: ajay devgn starring maidaan film first teaser poster released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.