ठळक मुद्देसलमान आणि सोमी आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. सोमीने १९९१ ते १९९७ या काळात सुमारे दहा चित्रपटात काम केले. १९९९ मध्ये तिचे आणि सलमानचे ब्रेकअप झाले.

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. सलमानचे चित्रपट नेहमीच १०० हून अधिक करोडचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर करतात. सलमान नेहमीच लोकांच्या मदतीसाठी देखील तत्पर असतो. सध्याच्या कोरोना व्हायरसच्या काळात तो विविध माध्यमाद्वारे लोकांना मदत करत आहे. या सगळ्यामुळे सलमानला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते.

सलमानने वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी त्याने अद्याप लग्न केलेले नाहीये. सलमान लग्न कधी करणार हा प्रश्न त्याला अनेकवेळा विचारला जातो आणि तो नेहमीच या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, सलमानच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने एका अभिनेत्रीने अद्याप लग्न केलेले नाही. या अभिनेत्रीचे आणि सलमानचे काही वर्षं प्रेमप्रकरणसुद्धा सुरू होते. ही अभिनेत्री सध्या बॉलिवूडपासून दूर परदेशात राहात आहे.

सलमानचे सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण आजवर चांगलेच गाजले आहे. सोमी अली मुळची पाकिस्तानची. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ती ओळखली जाते. सोमीची आई इराकी आणि वडील पाकिस्तानी आहेत. १२ वर्षांपर्यंत सोमी पाकिस्तानात शिकली. यानंतर आपल्या पालकांसोबत फ्लोरिडाला शिफ्ट झाली. सोमीला सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये करियर करायचे होते. पण ती बॉलिवूडमध्ये येण्याचे सर्वात मोठे कारण सलमान खान होते. होय, सलमानवर लहानपणापासूनच सोमीचे क्रश होते. ‘मैंने प्यार किया’ पाहिल्यानंतर सलमानसोबतच लग्न करायचे, असे तिने ठरवले होते. सोमीचा कल बघून तिच्या आईने तिला मुंबईला पाठवले. पण सोमीला बॉलिवूडपेक्षाही सलमान हवा होता. खरे सांगायचे तर सलमानचा पिच्छा करत करतच ती फ्लोरिडावरून मुंबईत पोहोचली होती. यावेळी ती केवळ १६ वर्षांची होती.

मुंबईत आल्या आल्या तिने मॉडेलिंग सुरू केले आणि मग बॉलिवूडमध्ये संधी शोधत राहिली. ही ती संधी होती, ज्याद्वारे ती सलमानपर्यंत पोहोचू शकणार होती. अखेर तिची ही इच्छा पूर्ण झाली. चित्रपटात काम करत असताना एक दिवस ती सलमानला भेटली. एका मुलाखतीत सोमीने हा सगळा प्रवास सांगितला होता. सलमान माझा पहिला बॉयफ्रेन्ड होता. त्याच्यासाठीच मी बॉलिवूडमध्ये आली. त्याच्याकडून मी खूप काही शिकले. आज मी जे काही आहे, ते त्याच्याचमुळे, असे ती म्हणाली होती.

सलमान आणि सोमी आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. सोमीने १९९१ ते १९९७ या काळात सुमारे दहा चित्रपटात काम केले. १९९९ मध्ये तिचे आणि सलमानचे ब्रेकअप झाले. याचे कारण होते, ऐश्वर्या राय. या ब्रेकअपनंतर सोमीने बॉलिवूड सोडले आणि ती पुन्हा कधीच बॉलिवूडमध्ये दिसली नाही. यानंतर २०११ मध्ये ती सलमानला भेटली होती. तिनेच याबद्दल सांगितले होते. २०११ मध्ये मी सलमानला भेटले होते. त्यावेळी मी बँकॉकमध्ये होते. सलमानही एका शूटींगसाठी येथे आला होता. तिथे आम्ही भेटलो. आता आम्ही आपआपल्या आयुष्यात खूप पुढे गेलो आहोत, असे तिने सांगितले होते.

सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी फ्लोरिडाला परतली. येथे तिने सायकॉलॉजीचे शिक्षण घेतले. यानंतर मियामी युनिव्हर्सिटीतून जर्नालिझम केले. यादरम्यान डॉक्युमेंट्री बनवण्यात तिला रस वाटू लागला. पुढे तिने न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकेडमीत प्रवेश घेतला. त्यानंतर सोमीने महिलांच्या आयुष्यावर काही लघुपट बनवले. २००६ मध्ये तिने महिलांच्या अधिकारांसाठी काम करायला सुरुवात केली आणि नो मोअर टीअर्स नावाची संस्था स्थापन केली. वयाच्या पाचव्या वर्षी सोमीवर लैंगिक अत्याचार झाला होता. हेच ही संस्था सुरू करण्यामागचे खरे कारण होते. आता सोमी जगभरातील महिलांच्या अधिकारांसाठी काम करते. सोमीच्या या संस्थेचे हजारो सदस्य आहेत. सोमी कदाचित आजही सलमानवर तेवढेच प्रेम करते. म्हणूनच आजपर्यंत ती अविवाहित आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After break with Salman khan Somy ali left bollywood and settled in abroad PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.