Accept the change in the film industry! -Sony Razdan | चित्रपटसृष्टीत होणारे बदल स्विकारा! -सोनी राजदान

चित्रपटसृष्टीत होणारे बदल स्विकारा! -सोनी राजदान

अबोली कुलकर्णी

 ‘चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करणं हे खरंच खुप कठीण काम असतं. स्क्रिप्ट, स्टारकास्ट, टेक्निकल बाबी, प्रमोशन, शूटींग, कलाकारांच्या तारखा, विषयाची निवड या सर्व बाबींचा विचार निर्माता-दिग्दर्शक यांना करावा लागतो. तरीही प्रदर्शनाच्या वाटेत येणाऱ्या  सर्व अडचणींवर मात करून चित्रपट रिलीज केला जातो. त्यामुळे चित्रपटसृष्टीत होणारे नवे बदल स्विकारा,’ असे मत अभिनेत्री सोनी राजदान यांनी व्यक्त केले. ‘नो फादर्स इन काश्मीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत साधलेला हा संवाद..                 

* ‘नो फादर्स इन काश्मीर’ या चित्रपटातून तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहात. चित्रपटाच्या कथानकाविषयी आणि तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल? 
- एका ब्रिटीश-काश्मिरी नूर नामक किशोरवयीन मुलीची कथा यात रेखाटण्यात आली आहे. आपल्या पित्याचा शोध घेत असताना नूरला तिचा भूतकाळ सापडतो, असे याचे कथानक आहे. यात मी नूरच्या आजीची भूमिका साकारत आहे. त्यांचं जग फार छान असतं. ते एवढ्या टेन्शनमध्ये असून देखील हसत राहतात. ही एक रोमँटिक लव्हस्टोरी आहे. खूपच एंटरटेनिंग आहे. 

* तुमच्याकडे जेव्हा चित्रपटाचा प्रस्ताव आला तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?
- खूप छान वाटलं. खरंतर चित्रपटाची कथा एवढी सुंदर आणि वेगळी आहे की, मी नाही म्हणूच शकले नाही. अशा वेगळया भूमिका करायला मला आवडतातच. नूर इंग्लंडमध्ये राहत असते. ती तिच्या वडिलांना शोधण्यासाठी काश्मीरमध्ये येते. तिथे तिचे प्रेम एका तरूणासोबत होते. ते दोघे मिळून मग तिच्या वडिलांना शोधतात. तो संपूर्ण प्रवास म्हणजे ‘नो फादर्स इन काश्मीर’ हा चित्रपट आहे. 

* ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ कडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चित्रपटाला संघर्ष करावा लागला. याबद्दल काय सांगाल?
- होय, नक्कीच मी खूप खूश झाले. प्रमाणपत्र मिळाल्याने संपूर्ण टीमला खूप आनंद झाला. असं वाटलं की, आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीचे आणि कष्टाचे चीज झाले. मला असं वाटतं की, चांगलं आणि आशयपूर्ण कथानक असेल तर हा संघर्षाचा प्रवास चित्रपटाला करावाच लागतो.

* तुम्ही तुमच्या करिअरला इंग्लिश थिएटरपासून सुरूवात केली होती. त्यानंतर काळानुसार इंडस्ट्रीत कोणते बदल झालेत, असे तुम्हाला वाटते?
- नक्कीच. नवीन बदल होत आहेत. वेगवेगळे विषय, स्क्रिप्ट, नवीन कलाकार मंडळी यांचा अंतर्भाव वाढत असल्यामुळे काम करायलाही मजा येत आहे. टेक्निकल बाबी, तंत्रज्ञानात होणारे बदल या बाबींचा वापर आधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे. ती एक चांगली बाब आहे.

* तुम्ही ‘राजी’ चित्रपटात मुलगी आलियासोबत काम केले आहे. एक अभिनेत्री म्हणून तुमचा तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?   
- आम्ही दोघींनी खऱ्या  आयुष्यातील भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत. आई आणि मुलगी हे नातं तिच्यासोबत साकारणं खरंतर माझ्यासाठी खूप कठीण होतं. मला आवडतं तिच्यासोबत प्रोफे शनल पातळीवर काम करणं. ती सध्याच्या बॉलिवूडमधील अभिनेत्रींपैकी एक हुशार अभिनेत्री आहे. तिने तिला मिळालेल्या कामामधून स्वत:ला सिद्ध केलं आहे. ती भूमिका निवडताना स्वत:साठी आव्हानात्मक ठरेल, अशाच भूमिका निवडते. त्यामुळे ती खरंच एक खूप मेहनती अभिनेत्री आहे. 

* सध्या आलिया-रणबीर यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू आहे. काय सांगाल याविषयी?  
- मी माझ्या मुलीबद्दल काही बोलणार नाहीये. तिला तिच्या आयुष्यात काय करायचे आहे? तिला कोणाला डेट करायचं आहे? कोणासोबत लग्न करायचे आहे? या सर्व तिच्या आयुष्यातील प्रश्नांचा विचार करणं सर्वस्वी तिच्यावर अवलंबून आहे.                               

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Accept the change in the film industry! -Sony Razdan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.