कुठे आहात? घरीच थांबा! ताई, बप्पा येताहेत; बीडमध्ये उमेदवारांचा गाठीभेटीवर भर
By सोमनाथ खताळ | Updated: April 17, 2024 15:46 IST2024-04-17T15:44:34+5:302024-04-17T15:46:04+5:30
बीडच्या उमेदवारांचा गाठीभेटीवर भर; कोणाकडे चहा-नाश्ता, तर कोणाकडे जेवण

कुठे आहात? घरीच थांबा! ताई, बप्पा येताहेत; बीडमध्ये उमेदवारांचा गाठीभेटीवर भर
बीड : कुठे आहेत... काय चाललंय... बरं... घरीच थांबा ताई, बप्पा तुम्हाला भेटायला येत आहेत. असे कॉल बीडमधील लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे आणि बजरंग साेनवणे यांच्या पदाधिकाऱ्यांकडून काही लोकांना जात आहेत. घरी गेल्यावर वेळेनुसार चहा-नाश्ता, तर कोणाकडे जेवणही केले जात आहे. सध्या तरी प्रचार, सभा यापेक्षा गाठीभेटींवरच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भर दिल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. १८ एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होईल; परंतु त्याआधीच महायुतीकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे, तर वंचितकडून अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी मिळाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच हे सर्वच नेते गाठीभेटी आणि संपर्कावर भर देताना दिसत आहेत. अजून तरी प्रचार, सभांमधून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपाला तेवढी सुरुवात झाली नाही. जुने पदाधिकारी, कार्यकर्ते, ओळखीचे ज्येष्ठ नागरिक आदींच्या घरी जाऊन भेटी दिल्या जात आहेत. महायुतीचे उमेदवार शिंदेसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पदाधिकाऱ्यांच्या घरी जात आहेत, तर आघाडीचे उमेदवार हे शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्या घरी जात असल्याचे दिसत आहे. यावेळी घरी आल्यावर या उमेदवारांना चहा, पाणी, नाश्ता दिला जात आहे. काही लोकांकडे जेवणही केले जात असल्याचे सांगण्यात आले.
पंकजा मुंडेंनी बनवला चहा
उमेदवारी जाहीर झाल्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे बीडला येत होत्या. अहमदनगरहून पाथर्डीमार्गे येताना शिवाजीराव कर्डिले यांच्या घरी त्या थांबल्या. त्यांनी कार्यकर्त्यांसाठी येथे चहादेखील बनवला होता. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
गड, दर्गाह, मंदिरांमध्ये जाऊन दर्शन
तीनही पक्षांच्या उमेदवारांनी श्रीक्षेत्र नारायणगडासह जिल्ह्यातील इतर देवस्थान, दर्गाह, मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले आहे. त्या ठिकाणी पूजाही केली. श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे पंकजा मुंडे यांनी भाविकांना पंगतही वाढली होती.
आता बैठकांवरही दिला जातोय भर
गाठीभेटी घेऊन उमेदवारांकडून संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला जात होता; परंतु आता पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेतल्या जात आहेत. याच बैठकांचे छोट्या सभांमध्ये रूपांतर होताना दिसत आहे. या ठिकाणी आता पदाधिकारी, उमेदवार हे विरोधकांवर आरोप करताना दिसत आहेत.