रुपाली ठोंबरेंकडून व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल; जितेंद्र आव्हाडांची पोलिसात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 21:29 IST2024-12-28T21:14:04+5:302024-12-28T21:29:15+5:30

व्हायरल करण्यात आलेले स्क्रीनशॉट एडिटेड असल्याचा दावा करत आव्हाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Screenshots of WhatsApp chatting from Rupali Thombre go viral ncp mla Jitendra Awad lodged a complaint at the police station | रुपाली ठोंबरेंकडून व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल; जितेंद्र आव्हाडांची पोलिसात धाव

रुपाली ठोंबरेंकडून व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल; जितेंद्र आव्हाडांची पोलिसात धाव

NCP Jitendra Awhad: बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आज आयोजित केलेल्या मोर्चात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील सहभागी झाले होते. यावेळी आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करत रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरी यांनी आव्हाड यांचे कथित व्हॉट्सअॅप संभाषण व्हायरल केले. मात्र हे स्क्रीनशॉट एडिटेड असल्याचा दावा करत आव्हाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप करत रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं होतं की, "सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी हे सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड." यासोबतच ठोंबरे यांनी व्हॉट्सअॅप संभाषणाचे काही स्क्रीनशॉटही आपल्या पोस्टमध्ये जोडले होते. 

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

रुपाली ठोंबरे यांच्यावर पलटवार करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "बीडचे रहिवाशी शिवराज बांगर यांच्यासोबतचे न केलेले चॅट मॉर्फ करून वायरल करण्यात आले. त्यात महत्त्वाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटाच्या ॲड. रूपाली ठोंबरे यांची आहे. हास्यास्पद आहे की, एक ज्येष्ठ वकील असून देखील सत्य-असत्य न तपासता त्यांनी हा मॉर्फ केलेला चॅट वायरल केला. ३ वाजून ०७ मिनिटांनी भाषण संपले आणि ३ वाजून २६ मिनिटांनी हा चॅट या भूमीवर अवतरला. मला समजतच नाही की, जर गुन्हा केलाच नाही तर एवढे अस्वस्थ का होतात? कर नाही तर डर कशाला? असो, बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. खेडकर यांना भेटून मी, संदीप क्षीरसागर,  राजेश देशमुख, सातपुते आणि शिवराज बांगर यांनी गुन्हा नोंदवलेला आहे," अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे.

दरम्यान, "ज्या शिवराज बांगरचा चॅट दाखविला गेलेला आहे त्या शिवराज बांगरच्या कुटुंबियांना आयुष्यातून उद्ध्वस्त करण्यासाठी वाल्या कराडने जंगजंग पछाडले. शिवराज बांगर हा गरीब कुटुंबातील असल्याने पोलीसही त्याच्यावर पटापट गुन्हे नोंदवतात. सर्वात हास्यास्पद गुन्हा म्हणजे, शिवराज बांगर याने वाल्या कराडकडून खंडणी मागितली, आहे की नाही विनोद," असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

Web Title: Screenshots of WhatsApp chatting from Rupali Thombre go viral ncp mla Jitendra Awad lodged a complaint at the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.