Pankaja Munde: 'सध्या मीच बेरोजगारच आहे, त्यामुळे...' पंकजा मुडेंच्या वक्तव्याची पुन्हा चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 14:17 IST2022-09-29T14:15:54+5:302022-09-29T14:17:38+5:30
'मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. हेच सध्या सुरू आहे.'

Pankaja Munde: 'सध्या मीच बेरोजगारच आहे, त्यामुळे...' पंकजा मुडेंच्या वक्तव्याची पुन्हा चर्चा
परळी: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची सध्या चर्चा सुरू आहे. 'मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Narendra Modi) हरवू शकत नाहीत,' असे वक्तव्य पंकजा मुंडेंनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या विधानानंतर पंकजा मुंडे याचे आणखी एक वक्तव्य समोर आले आहे.
'मी तुला ट्रोल करतो...'
परळीत संत भगवानबाबा प्रतिष्ठान तर्फे आयोजित सार्वजनिक दुर्गा मोहत्सवात पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, 'मी कुणाला काम दिले तरच मला काम मिळेल, पण सध्या मीच बेरोजगारच आहे. त्यामुळे मी कुणाला काम देऊ शकत नाही', असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, 'मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हेच सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.'
'आत्ताचे युद्ध वेगळे आहे'
त्या पुढे म्हणाल्या की, 'जुन्या काळात वेगळ्या पद्धतीने युद्ध व्हायची. आता नव्या काळात वेगळी युद्ध होतात. साहेबांच्या वेळचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती. आत्ताचे युद्ध वेगळे आहे. हे युद्ध सोशल मीडियावर लढले जाते. आता तलवारी, भाले, ढाली यांची काहीच गरज नाही. हे सोशल मीडियाचे युद्ध आहे, आपण यात बसत नाही,' असही पंकजा मुंडे म्हणाल्या.
मोदींबद्दल काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडच्या अंबाजोगाई येथे करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, 'काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मीसुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणीही संपवू शकतं नाही. मी जर लोकांच्या मनामध्ये राज्य केलं तर नरेंद्र मोदी देखील मला संपवू शकणार नाही,' असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या होत्या.