मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून...; खातेवाटप होताच मंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 20:31 IST2024-12-22T20:25:42+5:302024-12-22T20:31:05+5:30
मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून...; खातेवाटप होताच मंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले?
NCP Dhananjay Munde ( Marathi News ) : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर आठवड्याभराने काल शनिवारी खातेवाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर वादात सापडलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. या जबाबदारीची घोषणा झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि राज्यातील जनतेला आपण दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडू, अशा शब्दांत आश्वस्त केलं आहे.
धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यंत्री तथा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा. सुनीलजी तटकरे साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय प्रफुल्ल भाई पटेल यांसह सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो. राज्यातील जनतेशी थेट निगडित हे खाते असल्याने मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन," असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
मंत्रिमंडळातून हकालपट्टीची होत होती मागणी
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण राज्यभर गाजले. यासह आठवडाभरात परळीतील उद्योजक अपहरण, बीडमधील गोळीबार, मस्साजोगमधीलच खंडणी प्रकरण आदी घटनांमुळे बीड आहे की बिहार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. बीडमधील सरपंच हत्यासह इतर मुद्दे जिल्ह्यातील सत्ताधारी, विरोधी आमदारांनी अधिवेशनात उपस्थित केले. या सर्वांच्या बोलण्यातून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे दिसले. त्यामुळे सरपंच हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करावं, अशी मागणीही विरोधी पक्षातील आमदारांसकडून करण्यात येत होती.
'या' आमदारांनी अधिवेशनात उठवला आवाज
बीडमधील वेगवेगळ्या प्रकरणांवर हिवाळी अधिवेशनात आमदारांनी आवाज उठवला. यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आदी लोकप्रतिनिधींचा समावेश होता. याचीच दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारांविरोधात मकोका कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याचं सांगितलं.