बीडमधून उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; शरद पवारांच्या भेटीनंतर ज्योती मेटेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 03:55 PM2024-04-03T15:55:57+5:302024-04-03T15:59:18+5:30

Sharad Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत लोकसभेबाबत सुरू असलेली चर्चा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे, अशी माहिती मेटे यांनी दिली आहे.

Jyoti Mete reaction on beed lok sabha candidacy after Sharad Pawars meeting | बीडमधून उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; शरद पवारांच्या भेटीनंतर ज्योती मेटेंची प्रतिक्रिया

बीडमधून उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; शरद पवारांच्या भेटीनंतर ज्योती मेटेंची प्रतिक्रिया

Jyoti Mete ( Marathi News ) : बीड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली असली तरी मुंडे यांच्याविरोधात कोणाला मैदानात उतरवायचं, याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अद्याप विचारमंथन सुरू आहे. बीड लोकसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्यासमोर ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. यातील एका नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पवार यांनी अनेकदा बैठका घेतल्या. मात्र उमेदवारीबाबत अजूनही संभ्रम कायम असून ज्योती मेटे यांनी आज पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीत पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर मेटे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रियाही दिली आहे.

शरद पवारांसोबत झालेल्या चर्चेविषयी माहिती देताना ज्योती मेटे म्हणाल्या की, "मी यापूर्वी शासकीय सेवेत होते. मात्र काही दिवसांपूर्वी मी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत लोकसभेबाबत सुरू असलेली चर्चा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. आता शरद पवारांकडून आम्हाला अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे," अशी माहिती मेटे यांनी दिली आहे.

आरक्षण आंदोलनानंतर बदलली बीडमधील राजकीय स्थिती

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, यासाठी राज्यभरात मोठं आंदोलन झालं. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाचे राजकीय आणि सामाजिक पडसादही उमटत आहेत. या आंदोलनानंतर बीडमध्ये मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालं असून आरक्षणाच्या मागणीची दाहकता बीड जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असा एक मतप्रवाह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहे. मात्र त्याचवेळी पक्षाकडे उमेदवारीसाठी बजरंग सोनवणे यांच्या रुपाने तळागाळात संपर्क असणारा दुसराही एक पर्याय आहे. त्यामुळे शरद पवारांकडून उमेदवार निश्चित करण्यासाठी वेळ घेतला जात आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवसांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बीडच्या उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Jyoti Mete reaction on beed lok sabha candidacy after Sharad Pawars meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.