बीड जिल्ह्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादीचा बोलबाला; पण काँग्रेस, दोन्ही सेनेला ‘अच्छे दिन’ कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:09 IST2025-12-24T12:08:14+5:302025-12-24T12:09:39+5:30
नगरपालिकेत पूर्ण अपयश : बोटावर मोजण्याइतक्या जागांवरच विजय; नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न

बीड जिल्ह्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादीचा बोलबाला; पण काँग्रेस, दोन्ही सेनेला ‘अच्छे दिन’ कधी?
- साेमनाथ खताळ
बीड : नुकत्याच पार पडलेल्या बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी (अजित पवार) व राष्ट्रवादी (शरद पवार) यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, एकेकाळी सत्तेत महत्त्वाचा वाटा असणारी काँग्रेस आणि राज्यातील सत्तेत किंवा प्रबळ विरोधात असणाऱ्या दोन्ही शिंदेसेना व उद्धवसेना जिल्ह्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. बोटावर मोजण्याइतक्या जागांवरच या पक्षांचे उमेदवार मैदानात होते आणि जेमतेम काही ठिकाणीच ते विजयी झाले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीच्या वादळापुढे त्यांचा टिकाव लागला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई आणि परळी अशा सहा नगरपालिकांसाठी निवडणुका झाल्या. यात भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीने आपल्या परीने अध्यक्ष आणि सदस्य निवडून आणले. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर वेगळी गणिते पाहायला मिळाली. कुठे शिंदेसेनेने भाजपला, तर कुठे उद्धवसेनेने राष्टवादी (शरद पवार)ला साथ दिली होती. परंतु, आघाडी आणि युतीत असूनही आपल्या पक्षाला जास्त जागा मिळवून त्यावर विजय साजरा करण्यात या तिन्ही पक्षांना सपशेल अपयश आल्याचे दिसत आहे. या तिन्ही पक्षांच्या वाट्याला आलेला हा राजकीय 'दुष्काळ' संपून ‘अच्छे दिन’ कधी येणार, असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.
बीडमध्ये एमआयएमची खराब कामगिरी
बीड नगरपालिकेत २०१६ ला एमआयएमचे तब्बल १० नगरसेवक निवडून आले होते. बहुमतासाठी या पक्षाकडे तेव्हा विनवणी करावी लागली होती. परंतु, यावेळी बीडमध्ये केवळ एकाच जागेवर या पक्षाला यश मिळाले आहे. खासदार इम्तियाज जलील यांची सभा होऊनही मतदारांनी पाठ फिरवली. याशिवाय परळी आणि माजलगावमध्ये प्रत्येकी एका जागेवर या पक्षाला यश मिळाले आहे. बीडमध्ये या पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला अत्यंत अल्प मते मिळाली; मागील वेळी याच पदासाठी त्यांचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता.
संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न
आम्ही नवीन आहोत, पण तरीही पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आगामी काळात जास्तीत जास्त जागा निवडून आणत यशोशिखर गाठण्याचा प्रयत्न करू.
- उल्हास गिराम, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना
यश-अपयश चालत असते
परळीत पहिलीच जागा बिनविरोध काढली. बीडमध्येही तीन जागा आल्या. निवडणुकीत यश-अपयश चालत असते. मात्र, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये ही त्रुटी नक्कीच भरून काढली जाईल.
- सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना
२०१६ चे पक्षीय बलाबल
नगरपालिका - एकूण जागा - पक्षनिहाय आकडेवारी
बीड - ५० - काकू-नाना १९, राष्ट्रवादी १८, एमआयएम १०, सेना २, भाजप १
परळी - ३३ - राष्ट्रवादी २७, भाजप १, रिपाइं १, युती २, सेना १, काँग्रेस १
अंबाजोगाई - २९ - राष्ट्रवादी १६, भाजप ७, काँग्रेस ६
माजलगाव - २४ - आघाडी १२, राष्ट्रवादी ८, सेना २, एमआयएम १, अपक्ष १
गेवराई - १८ - भाजप १७, राष्ट्रवादी १
धारूर - १७ - भाजप ९, राष्ट्रवादी ६, आघाडी २
---
२०१६ ला नगराध्यक्ष कोणाचे
राष्ट्रवादी : ०२ (बीड आणि परळी)
भाजप : ०२ (गेवराई आणि धारूर)
काँग्रेस : ०१ (अंबाजोगाई)
स्थानिक आघाडी : ०१ (माजलगाव)
२०२५ चे नगराध्यक्ष कोणाचे
राष्ट्रवादी (अजित पवार) : ३ (परळी, बीड, धारूर)
भाजप : १ (भाजप)
राष्ट्रवादी (शरद पवार) : १ (माजलगाव )
स्थानिक आघाडी : १ (अंबाजोगाई)
-----
नगरपालिका - एकूण जागा - पक्षनिहाय आकडेवारी
बीड - ५२ - राष्ट्रवादी (अजित पवार) १९, भाजप १५, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, शिंदेसेना ३, एमआयएम १, उद्धवसेना १, काँग्रेस १.
परळी - ३५ - राष्ट्रवादी (अजित पवार) १६, भाजप ७, अपक्ष ६, शिंदेसेना २, राष्ट्रवादी (शरद पवार) २, एमआयएम १, काँग्रेस १
अंबाजोगाई - ३१ - लोकविकास महाआघाडी २०, शहर परिवर्तन जनविकास आघाडी ११
माजलगाव - २६ - राष्ट्रवादी (अजित पवार) १०, राष्ट्रवादी (शरद पवार) १०, अपक्ष ३, भाजप १, काँग्रेस १, एमआयएम १
गेवराई - २० - भाजप १६, राष्ट्रवादी (अजित पवार) ४
धारूर - २० - राष्ट्रवादी (अजित पवार) ११, भाजप ६, राष्ट्रवादी (शरद पवार) ३