धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अडचणीत: वाल्मीक कराडांवर केज तालुक्यातील खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:47 IST2024-12-12T15:46:34+5:302024-12-12T15:47:39+5:30

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यासह तिघांविरोधात केज पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.

beed Case filed against Dhananjay Munde supporter Valmik Karad in Kej Taluka extortion case | धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अडचणीत: वाल्मीक कराडांवर केज तालुक्यातील खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अडचणीत: वाल्मीक कराडांवर केज तालुक्यातील खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. ज्या पवनचक्की कंपनीच्या कार्यालय परिसरात झालेल्या वादावरून ही हत्या करण्यात आली त्या पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यासह  तिघांविरोधात केज पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. वाल्मीक कराड (रा. परळी), विष्णू चाटे (रा. कौडगाव, ता. केज) व सुदर्शन घुले (रा. टाकळी, ता. केज) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सुनिल केदू शिंदे (वय ४२, रा. नाशिक ह. मु. बीड) असे फिर्याद देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. 

शिंदे हे मागील एका वर्षापासून अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवनऊर्जा प्रकल्पाची मांडणी व उभारणीचे काम आहे. मस्साजोग या ठिकाणी प्रकल्पाचे मुख्य कार्यालय आहे. २९ नोव्हेंबर रोजी शिंदे यांच्या मोबाइलवर विष्णू चाटे यांनी फोन केला. वाल्मीक अण्णा बोलणार आहेत असे सांगितले. त्यानंतर 'अरे, काम बंद करा. ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे, त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केले तर याद राखा,' असे म्हणून प्रकल्पाचे काम बंद करण्याची धमकी दिली. त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले हे कार्यालयात आले आणि पुन्हा धमकी दिली. 'काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू,' अशी धमकी दिली. 

काही दिवसांपूर्वी कंपनीचेच शिवाजी थोपटे यांना वाल्मीक कराड यांनी त्यांच्या परळी येथील कार्यालयात बोलावून अवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा, असे सांगितले. काम चालू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या, असे सांगितले होते. त्यानंतरही असे अनेकदा झाले. २८ नोव्हेंबर रोजीदेखील सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून शिंदे यांचे अपहरण केले होते. त्याबाबत केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालेली आहे. ६ डिसेंबर रोजीही सुदर्शन घुले व इतर लोकांनी मस्साजोग येथील प्रकल्पाच्या ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करून गेटवरील कामगारांना धमकी देऊन मारहाण केली होती. त्याचीही तक्रारी केज पोलिस ठाण्यात दिलेली असल्याचे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून तिघांविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या वादानंतरच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

Web Title: beed Case filed against Dhananjay Munde supporter Valmik Karad in Kej Taluka extortion case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.