अजित पवार बीडचे पालकमंत्री, पण त्यांच्याच पक्षाला पाच नगरपालिकांमध्ये भाजपचे आव्हान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:32 IST2025-11-22T12:30:03+5:302025-11-22T12:32:54+5:30
जिल्ह्यातील सहापैकी पाच नगरपालिकांमध्ये भाजप-राष्ट्रवादी थेट आमने-सामने

अजित पवार बीडचे पालकमंत्री, पण त्यांच्याच पक्षाला पाच नगरपालिकांमध्ये भाजपचे आव्हान!
- सोमनाथ खताळ
बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा राजकीय पेचप्रसंग समोर आला आहे. राज्यात महायुतीचे घटक पक्ष असूनही जिल्ह्यातील सहा नगरपालिकांपैकी तब्बल पाच ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थेट त्यांच्याच युतीतील सहकारी पक्ष असलेल्या भाजपचे आव्हान उभे राहिले आहे. यामुळे ही स्थानिक निवडणूक अत्यंत रंजक आणि निर्णायक बनली आहे.
अजित पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांची राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. महायुतीमधील स्थानिक नेत्यांनी जागावाटपावर एकमत न केल्यामुळे बीड, माजलगाव, धारूर, गेवराई आणि अंबाजोगाई या पाच महत्त्वाच्या नगरपालिकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी थेट लढत होत आहे. युतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. एकीकडे वरिष्ठ पातळीवर 'महायुती'चा नारा दिला जात असताना, स्थानिक स्तरावर मात्र दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या उमेदवारांना पाडण्यासाठी जोर लावत आहेत. हा संघर्ष म्हणजे स्थानिक नेतृत्वाचा अहंकार आणि राजकीय वर्चस्वासाठीची लढाई असल्याचे स्पष्ट होते.
परळी वगळता सर्वत्र संघर्ष
जिल्ह्यात फक्त परळी नगरपालिकेतच महायुतीचे चित्र दिसले. परळीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र येत आघाडी केली आहे. मात्र, उर्वरित पाच ठिकाणी युतीचा धर्म पाळला गेला नाही, ज्यामुळे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेतेही या विचित्र परिस्थितीवर भाष्य करणे टाळत आहेत.
राजकीय परिणाम काय होणार?
बीड जिल्ह्यातील या स्थानिक संघर्षाचा परिणाम अजित पवार यांच्या पालकमंत्री पदावरील पकडीवर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळाले नाही, तर भाजपला पालकमंत्री असूनही त्यांच्या पक्षाला बीडमध्ये आव्हान देण्यास यश आले, असा संदेश जनतेत जाईल. या थेट लढतीमुळे महायुतीच्या भविष्यातील स्थानिक राजकारणातील जागावाटपावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीचे बीडमध्ये आव्हान
जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीच अशी थेट लढत होत आहे. परंतु, बीड शहरात या दोन्ही पक्षांना महाविकास आघाडीचे आव्हान असणार आहे. यातही अंतर्गत वादावादीचा फटका आघाडीला बसण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी मात्र महाविकास आघाडीचे हवे तेवढे बळ दिसत नाही; परंतु निकालानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.