अकोला मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानाला उत्साहात सुरुवात, कडेकोट बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 08:22 AM2024-04-26T08:22:49+5:302024-04-26T08:26:08+5:30

Lok Sabha Election 2024 : प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचा 'यलो अलर्ट, दिलेला आहे. यामुळे सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे.

Voting in the rural areas of Akola constituency started with enthusiasm | अकोला मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानाला उत्साहात सुरुवात, कडेकोट बंदोबस्त

अकोला मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानाला उत्साहात सुरुवात, कडेकोट बंदोबस्त

- राजरत्न  सिरसाट

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज, २६ एप्रिल रोजी अकोला मतदारसंघातील ग्रामीण भागात उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. अकोला मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यातील एक वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचा 'यलो अलर्ट, दिलेला आहे. यामुळे सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण  निवळल्यानंतर कमाल तापमान ४१ डिग्री सेल्सिअस असेल असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे सकाळपासूनच मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या दिसत आहेत. सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरू असल्याने शेतकरी शेतमजूर सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचून मतदान करण्याची लगबग दिसत आहे. 

अकोला लोकसभा मतदारसंघात प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह अपक्ष मिळून एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, भाजपाकडून महायुतीचे खासदार पूत्र अनुप धोत्रे, महाविकासआघाडी कडून काँग्रेसचे डॉ. अभय पाटील हे अकोला मतदारसंघातून रिंगणात आहेत. अकोला शहर व जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघ क्षेत्रातील २०५६ केंद्रांवर १८ लाख ९० हजार ८१४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहे. 

मतदारसंघात महिलांसाठी सात विशेष केंद्र असून, दिव्यांगांसाठी रेड कार्पेट अंथरलेले विशेष मतदान केंद्र साकारण्यात आले आहे. मतदान केंद्रावर हिरकणी कक्ष, मतदारांसोबत येणाऱ्या लहान चिमुकल्यांसाठी खेळण्याची व्यवस्था ही अकोला शहरातील काही मतदान केंद्रावर करण्यात आली आहे. आरोग्य सेवेसाठी वैद्यकीय तज्ज्ञांची चमू, पिण्याचे पाणी अशी विविध व्यवस्था करण्यात आली आहे.सर्वच मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Voting in the rural areas of Akola constituency started with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.