कडाक्याच्या उन्हात उष्माघाताची शक्यता; मतदान केंंद्रांच्या ठिकाणी तात्पुरते शेड उभारणार!
By संतोष येलकर | Updated: April 9, 2024 17:03 IST2024-04-09T17:03:05+5:302024-04-09T17:03:28+5:30
अकोला लोकसभा मतदारसंघात अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि रिसोड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, २ हजार ५६ मतदार केंद्रांच्या ठिकाणी मतदान घेण्यात येणार आहे.

कडाक्याच्या उन्हात उष्माघाताची शक्यता; मतदान केंंद्रांच्या ठिकाणी तात्पुरते शेड उभारणार!
अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून, एप्रिलमधील कडाक्याच्या उन्हात उष्माघाताची शक्यता विचारात घेता मतदारसंघातील शेड नसलेल्या मतदान केंद्रांच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात शेड उभारण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी सोमवारी दिली. अकोला लोकसभा मतदारसंघात अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि रिसोड या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, २ हजार ५६ मतदार केंद्रांच्या ठिकाणी मतदान घेण्यात येणार आहे.
एप्रिल महिन्यात प्रचंड उन्हामुळे उष्माघाताचा धोका निर्माण शक्यता आहे. त्यानुषंगाने उष्माघातापासून बचावासाठी मतदानाच्या दिवशी अकोला लोकसभा मतदारसंघातील ज्या मतदान केंद्रांच्या बाहेर शेड नाही, अशा मतदान केंद्राच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा प्रशासनामार्फत शेड उभारण्यात येणार असून, मतदारांसाठी सावलीची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासोबतच मतदान केंद्रांच्या पिण्याचे पाणी व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुंभार यांनी सांगीतले.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांची अशी आहे संख्या !
मतदारसंघ मतदान केंद्र
अकोट ३३६
बाळापूर ३४०
अकोला पश्चिम ३०७
अकोला पूर्व ३५१
मूर्तिजापूर ३८५
रिसोड ३३७
१०३८ मतदान केंद्रांवर होणार ‘वेब कास्टींग’
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकूण मतदान केंद्रांच्या ५० टक्के मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान प्रक्रियेचे ‘वेब कास्टींग ’ करावयाचे आहे. त्यानुसार अकोला लोकसभा मतदारसंघातील एकूण २ हजार ५६ मतदान केंद्रांपैकी १ हजार ३८ मतदान केंदांच्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेचे ‘वेब कास्टींग ’ करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कुंभार यांनी सांगीतले.
‘वेब कास्टींग’ च्या मतदान केंद्रांची अशी आहे संख्या !
अकोला लोकसभा मतदारसंघातील अकोट विधानसभा मतदारसंघातील १६८, बाळापूर विधानसभा मतदारसंघातील १७०, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील १६०, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील १७७, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील १९३ आणि रिसोड विधानसभा मतदारसंघातील १७० मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान प्रक्रियेचे ‘वेब कास्टींग’ करण्यात येणार आहे.