Akola Municipal Election 2026: कोणाला पुन्हा संधी? माजी महापौर, तीन माजी महापौरांचे कुटुंबीय आजमावणार नशीब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 14:08 IST2026-01-08T14:06:26+5:302026-01-08T14:08:31+5:30
अकोला महापालिका निवडणूक २०२६ : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महापालिका निवडणूक होत असून, अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले नेतेही निवडणूक लढवत आहेत.

Akola Municipal Election 2026: कोणाला पुन्हा संधी? माजी महापौर, तीन माजी महापौरांचे कुटुंबीय आजमावणार नशीब!
अकोला महानगरपालिका निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रभारी व माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यासह तीन माजी महापौरांच्या कुटुंबातील व्यक्ती निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहे. याशिवाय चार माजी उपमहापौर, तीन माजी स्थायी समिती सभापती आणि एक माजी विरोधी पक्षनेते पुन्हा एकदा मतदारांसमोर आपली ताकद आजमावत आहेत.
माजी महापौर विजय अग्रवाल हे भाजपच्या तिकिटावर सलग सहाव्यांदा निवडणूक लढवत असून, त्यांच्या अर्धांगिनी सुनीता अग्रवाल या दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड यांच्या पत्नी संगीता भरगड या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार आहेत.
भाजपच्या माजी महापौर अर्चना मसने यांचे पती जयंत मसने हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत तर काँग्रेसचे माजी महापौर सुरेश पाटील यांचे चिरंजीव चेतन पाटील हे शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे रिंगणात उतरले आहेत.
भाजपाच्या माजी महापौर रिंगणात
भाजपच्या माजी महापौर वैशाली शेळके या दुसऱ्यांदा उमेदवार असून महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती बाळ टाले हे चौथ्यांदा, संजय बडोणे हे सहाव्यांदा व विशाल इंगळे हे दुसऱ्यांदा भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.
माजी उपमहापौर सुनील मेश्राम हे महानगर विकास समितीतर्फे, विनोद मापारी भाजपतर्फे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे मो. रफिक सिद्दीकी पुन्हा एकदा रिंगणात आहेत. माजी विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसैन हेसुद्धा निवडणूक लढवत आहेत. सत्तेचा अनुभव, प्रशासनातील पकड आणि कार्यकाळातील विकासकामांचा लेखाजोखा घेऊन हे सर्व दिग्गज मतदारांसमोर उतरले असल्याने निवडणूक अधिकच रंगतदार ठरली आहे.
दिग्गजांसोबतच नवखे चेहरेही मैदानात
महापालिकेत यापूर्वी महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती पदांवर काम केलेले अनुभवी नेते तसेच नवखे, तरुण चेहरेही मोठ्या संख्येने रिंगणात उतरले आहेत. अनुभव आणि नव्या ऊर्जेची ही लढत निवडणुकीला अधिक चुरशीचे स्वरूप देत आहे.
दोन माजी सभापती आमने-सामने
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६-ड मध्ये स्थायी समितीच्या दोन माजी सभापतींमध्ये थेट लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे माजी उपमहापौर व माजी स्थायी समिती सभापती मो. रफिक सिद्दीकी, तर भाजपकडून माजी विरोधी पक्षनेते व माजी स्थायी समिती सभापती संजय बडोणे आमने-सामने असल्याने या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनुभवी नेत्यांमधील ही लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.