अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 11:57 IST2025-12-31T11:56:28+5:302025-12-31T11:57:12+5:30
शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीतून बाहेर पडत असल्याची घोषणा करत स्वबळाचा नारा दिला होता. त्यांनी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसनेच महायुती तोडल्याचा आरोप केला.

अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
अहिल्यानगर - महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढविण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला परंतु शिंदेसेनेने अवास्तव जागेची मागणी केल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) व भाजपा एकत्र निवडणुकीला सामोरे जात आहोत, असा पलटवार भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केला.
राष्ट्रवादी (अजित पवार) व भाजपाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यावेळी मोहिते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार) चे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालिसंग, मुकुल गंधे आदी उपस्थित होते. शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीतून बाहेर पडत असल्याची घोषणा करत स्वबळाचा नारा दिला होता. त्यांनी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसनेच महायुती तोडल्याचा आरोप केला. या आरोपाला भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष मोहिते यांनी शिंदेसेनेनेच अवास्तव जागांची मागणी करत महायुती तोडल्याचे सांगून प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, शिंदेसेनेने भाजपा व राष्ट्रवादी (अजित पवार) च्या माजी नगरसेवकांच्या काही जागांची मागणी केली होती. भाजपा व राष्ट्रवादी (अजित पवार) ने त्यांच्या माजी नगरसेवकांच्या जागेची मागणी केली, हे महायुती तोडण्यासाठीचे संयुक्तिक कारण नाही. महायुती करण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न होता. त्यांच्याशी फोनवरून वेळोवेळी संपर्क केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही. ते महायुतीतून बाहेर पडले, असाही आरोपी मोहिते यांनी केला.
सर्व्हेत नावे असलेल्यांना उमेदवारी
भाजपाकडून माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आले असल्याबाबत पत्रकारांनी छेडले असता मोहिते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर शहरात जनचाचणी घेतली. त्याआधारे उमेदवारीचे वाटप करण्यात आले आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांची नाराजी दूर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रभाग चारमधून एकही उमेदवार नाही
प्रभाग क्रमांक चारमधून भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) कडून उमेदवार देण्यात आलेले नाहीत. या प्रभागातून दोन्ही पक्षांकडे एकही अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे प्रभाग क्रमांक चारमधून दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शेवटच्या तासात ठरले उमेदवार
निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार शेवटचा दिवस होता. मात्र, दुपारी दोन वाजेपर्यंत कोणत्याही पक्षाने आपली उमेदवारी कोणाला याचा सुगावा लागू दिला नाही. पक्षांचे प्रतिनिधी 'एबी' फॉर्म घेऊन थेट दुपारी दोन वाजता आले. त्यानंतर आपणाला उमेदवारी मिळालेली नाही हे अनेकांना समजले. तीन वाजता अर्ज दाखल करण्याची मुदत संपत असल्याने शेवटच्या एक तासात अनेकांनी दुसऱ्या पक्षांचे एबी फॉर्म घेत अर्ज भरले. सावेडी, जुने महापालिका कार्यालय, केडगाव आणि बुरुडगाव रोड येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सकाळी ११ पासूनच उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. बहुतांश जणांनी दुपारी दोनपर्यंत उमदेवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, दोनपर्यंत प्रमुख पक्षांच्या उमेदवरांना 'एबी' फॉर्म देण्यात आले नव्हते. त्यामुळे बहुतांशी जणांच्या चेहऱ्यावर चिंता होती.