क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:17 IST2025-12-25T10:17:24+5:302025-12-25T10:17:53+5:30
प्रभागात ज्या पक्षाचे उमेदवार जास्त असतील त्याच पक्षाचे चिन्ह चारही उमेदवारांना दिल्यास परस्परविरोधी मतदान टाळता येईल असा एक मतप्रवाह आहे.

क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
अहिल्यानगर - महापालिका निवडणुकीत महायुती केल्यास परस्परविरोधी मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवार वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी त्यांना एक पॅनल एक चिन्ह देण्याची तयारी महायुतीकडून करण्यात येत आहे. चारही उमेदवार एकाच चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणूक एकत्रित लढविण्याबाबत महायुतीत चर्चा सुरू आहे. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदे सेना यांची स्वतःची व्होट बँक आहे. त्यामुळे महापालिकेत कुणालाही पूर्ण बहुमत यापूर्वी मिळालेले नाही. गतवेळी हे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. यावेळी ते एकत्र येत असून त्यांच्यात जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. तिन्ही पक्ष एकत्र आल्यास परस्परविरोधी मतदान होऊन मोठ्या प्रमाणात दगा फटका होण्याची शक्यता आहे. परस्परविरोधी मतदान झाल्यास त्याचा फायदा विरोधकांना होईल अशी भीती महायुतीकडून व्यक्त केली जात आहे.
प्रभागात ज्या पक्षाचे उमेदवार जास्त असतील त्याच पक्षाचे चिन्ह चारही उमेदवारांना दिल्यास परस्परविरोधी मतदान टाळता येईल असा एक मतप्रवाह आहे. मात्र बहुतांश इच्छुक गेल्या अनेक दिवसांपासून प्रभागात प्रचार करत आहेत. महायुतीत भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना या तीन पक्षांचा समावेश आहे. हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढल्यास अनेक प्रभागात तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना सोबतच प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे घड्याळाच्या चिन्हावरच निवडणूक लढवणाऱ्याला उमेदवाराला धनुष्यबाण आणि कमळाचाही प्रचार करावा लागणार आहे. यापूर्वीची निवडणूक एकमेकांविरोधात लढवलेले उमेदवार महायुतीमुळे एकत्र येणार असल्याने काहींसाठी चिन्ह अडचणीचे ठरू शकतात.