आघाडीच्या लंकेचे दहन करणार, पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करायचंय, एकनाथ शिंदेंचा निर्धार
By अण्णा नवथर | Updated: April 22, 2024 14:58 IST2024-04-22T14:57:59+5:302024-04-22T14:58:36+5:30
हनुमानाजीने जसं लंकेचे दहन केलं होतंतसंच दहन आघाडीच्या लंकेचं करायचे असून , पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान असमान करायचे आहे, असे आव्हान मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी नगर येथे केले.

आघाडीच्या लंकेचे दहन करणार, पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करायचंय, एकनाथ शिंदेंचा निर्धार
अहमदनगर : हनुमानाजीने जसं लंकेचे दहन केलं होतंतसंच दहन आघाडीच्या लंकेचं करायचे असून , पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान असमान करायचे आहे, असे आव्हान मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी नगर येथे केले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप माजी आमदार अरुण काका जगताप, आमदार राम शिंदे आदी उपस्थित होते.
गेल्या पन्नास वर्षात राहुल गांधींचे लॉन्चिंग होऊ शकले नाही. गरम झालं की थंड हवा खायला राहुल गांधी विदेशात जातात. ते स्वप्नातही पंतप्रधान होऊ शकत नाही. पंतप्रधान होण्याचा अधिकार फक्त मोदींनाच आहे. नाटक करून कोणालाही निवडून येता येत नाही. महायुतीची पाळीमुळे खोलवर गेली आहेत. महाविकास आघाडीचा वरून जरी कोणी आलं तरीही ते उघडता येणार नाहीत, असेही शिंदे म्हणाले.
मोदीचे इंजिन भक्कम आहे त्यांच्या इंजिनला अनेक डबे जोडलेले आहेत. डब्यामध्ये बसायला सर्वसामान्यांना जागा आहे. परंतु महाविकास आघाडीकडे एकच इंजिन आहे आणि त्या इंजिन मध्ये प्रत्येकाला बसायचे आहे. इंजिन मध्ये फक्त तीन ते चार जणांनाच बसायला जागा असते. त्यामुळे सर्वसामान्यांना महाविकास आघाडीच्या डब्यात बसण्यासाठी जागा नाही. तुमच्यासाठी जागा फक्त मोदीजींच्याच बोगीमध्ये आहे, असे फडणवीस म्हणाले.