आरटीईतील बदलाने विदर्भाला झाला फायदा

By अविनाश साबापुरे | Published: May 17, 2024 04:59 PM2024-05-17T16:59:22+5:302024-05-17T17:00:20+5:30

चार हजार जागा वाढल्या : गडचिरोली वगळता सर्वत्र शाळाही वाढल्या

Vidarbha has benefited from the change in RTE | आरटीईतील बदलाने विदर्भाला झाला फायदा

Vidarbha has benefited from the change in RTE

यवतमाळ : यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत सरकारने केलेले बदल न्यायालयाने स्थगित केले. आता शुक्रवारपासून सुधारित पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या उलथापालथीत विदर्भातील गोरगरीब विद्यार्थ्यांचा घसघशीत फायदा होणार आहे. कारण बदललेल्या प्रक्रियेत मोफत शाळा प्रवेशासाठी विदर्भात तब्बल चार हजार जागा मागील वर्षीच्या तुलनेत वाढल्या आहेत. तर गडचिरोली वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये शाळांची संख्याही वाढली आहे.

मागील वर्षी म्हणजेच २०२३-२४ या सत्रात आरटीई अंतर्गत मोफत शाळा प्रवेशासाठी विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये दोन हजार १८२ शाळांनी सहभाग घेतला होता. परंतु, यंदा २०२४-२५ या सत्राच्या प्रवेश प्रक्रियेत विदर्भातील दोन हजार २४८ शाळांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी १७ हजार ७१७ जागा मोफत प्रवेशासाठी राखीव करण्यात आल्या होत्या. त्यातुलनेत यंदा राखीव जागा तीन हजार ९७१ इतक्या वाढून एकूण राखीव जागांची संख्या २१ हजार ६८८ इतकी झाली आहे.

हीच बाब विदर्भाव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातही घडली आहे. यंदा राज्य शासनाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला खासगी अनुदानित, स्वयंअर्थसहायित शाळांसोबतच शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचीही नोंदणी बंधनकारक केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल ७६ हजार ५३ शाळांची नोंदणी झाली होती. तर आठ लाख ८६ हजार ४११ इतक्या जागा राखीव दाखविण्यात आल्या होत्या. परंतु, अर्ज भरताना खासगी स्वयअर्थसहायित शाळांच्या जागाच दिसत नसल्याने पालकांचा रोष वाढला होता. या प्रकरणात न्यायालयाने शासनाने केलेल्या बदलांना स्थगिती दिली. आता १७ ते ३१ मेपर्यंत जुन्यात पद्धतीने पालकांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अनुदानित, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा वगळल्याने आता शाळांची संख्याही घटली आहे. परंतु, मागील वर्षीचा विचार करता शाळांची ही संख्या अधिक आहे. यंदा महाराष्ट्रातील नऊ हजार १३९ शाळांनी या प्रक्रियेत सहभाग घेऊन एक लाख दोन हजार ४३६ जागा राखीव ठेवल्या आहेत. तर मागील वर्षी आठ हजार ८२८ शाळांनी नोंदणी करुन एक लाख एक हजार ९६९ जागा राखीव ठेवल्या होत्या. त्यामुळे यंदा ३११ शाळा आणि ४६७ जागा वाढलेल्या आहेत.

विदर्भात असा झाला फायदा
जिल्हा : मागील शाळा/जागा : यंदाच्या शाळा/जागा

अकोला : १९०/१२१५                 : १९६/२०१०
अमरावती : २३६/१९९८              : २३१/२३६९
बुलडाणा : २२७/१७७८               : २३४/२५८१
यवतमाळ : १९४/२४४०                : २१०/१९६६
वाशिम : ९९/९५०                         : १०९/९५३
चंद्रपूर : १८६/१८४६                      : १९९/१५१६
गडचिरोली : ६६/१५७४                : ६६/४८४
भंडारा : ८९/९५५                           : ९१/७७२
गोंदिया : १३१/१२२५                     : १३२/९०३
नागपूर : ६५३/२६१८                     : ६५५/६९२०
वर्धा : १११/१११८                              : १२६/१२१४
एकूण : २१८२/१७,७१७                  : २२४९/२१,६८८

Web Title: Vidarbha has benefited from the change in RTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.