भावना गवळी म्हणाल्या- 'मीच उमेदवार'; पदाधिकाऱ्यांची बैठक घेत कामाला लागण्याचे निर्देश
By विशाल सोनटक्के | Updated: March 21, 2024 18:27 IST2024-03-21T18:24:53+5:302024-03-21T18:27:30+5:30
Bhavana Gawali, Lok Sabha Election 2024: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. पण आचारसंहिता जाहीर झाल्याने आता संभाव्य उमेदवार आपापल्या स्तरावर तयारी करताना दिसत आहेत.

भावना गवळी म्हणाल्या- 'मीच उमेदवार'; पदाधिकाऱ्यांची बैठक घेत कामाला लागण्याचे निर्देश
Bhavana Gawali, Lok Sabha Election 2024: विशाल सोनटक्के, यवतमाळ: महायुतीमध्ये उमेदवारीवरून संभ्रम असतानाच गुरुवारी भावना गवळी यांनी शहरातील समर्थवाडीमधील निवासस्थानी मतदारसंघातील निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पक्षश्रेष्ठींनी उमेदवारीसाठी हिरवा झेंडा दाखविला आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रचाराच्या कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. सुमारे चार तास ही बैठक चालली.
महायुतीमधून गवळी यांच्या उमेदवारीबाबत मागील आठवडाभरापासून संभ्रम आहे. त्यातच बुधवारी खासदार भावना गवळी यांच्यासह शिंदे गट शिवसेनेतील खासदारांनी ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गुरुवारी दुपारी खासदार गवळी यवतमाळमध्ये दाखल झाल्या. त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना निवासस्थानी बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. सुमारे शंभरवर पदाधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थिती होती.
यामध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गुणवंत ठोकळ, शहर प्रमुख पिंटू बांगर, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा प्रमुख शब्बीर खान, युवा सेना जिल्हा प्रमुख आकाश कुटेमाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. गवळी यांनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांना निवडणूक प्रचाराला लागा, अशा सूचना दिल्या. पक्षश्रेष्ठींशी माझे बोलणे झाले असून पुढील दोन दिवसात महायुतीकडून उमेदवारीची घोषणा होईल. त्यामुळे आता वेळ न दवडता जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करा, असे त्या म्हणाल्या.