नितेश राणेंचा बविआवर हल्लाबोल; अनधिकृत बांधकामे, दफनभूमी अन् बांगलादेशी मोहल्ल्यावरून बरसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 19:55 IST2026-01-12T19:55:04+5:302026-01-12T19:55:42+5:30
जिथे तिथे अनधिकृत इमारती बांधायचा. तिथे बांगलादेशींना घरे द्यायची आणि व्होट जिहाद करायचा हा एकमेव कार्यक्रम आहे असं सांगत नितेश राणे यांनी बहुजन विकास आघाडीवर हल्लाबोल केला.

नितेश राणेंचा बविआवर हल्लाबोल; अनधिकृत बांधकामे, दफनभूमी अन् बांगलादेशी मोहल्ल्यावरून बरसले
वसई - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी बहुजन विकास आघाडीवर हल्लाबोल केला. शहरात अनधिकृत बांधकामे वाढवली, हिंदू वस्तीत दफनभूमी बनवली. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना वसवले असं सांगत नितेश राणेंनी विरोधकांवर निशाणा साधला.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, बहुजन विकास पार्टीने या शहरात बांगलादेशी वाढवले. खेळाच्या मैदानावर अनधिकृत बांधकामे उभारली हा विकास त्यांनी केलाय. त्याचे श्रेय आम्ही घेत नाही. आम्हाला मुलांना खेळण्यासाठी ग्राऊंड द्यायचे आहे. सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नोकरी द्यायची आहे. इथल्या नागरिकांना १८ प्रकारच्या नागरी सुविधा द्यायच्या आहेत. यासाठी भाजपा आणि शिवसेनेचे उमेदवार आम्हाला इथे निवडून आणायचे आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच बाहेरचे नेते म्हणजे काय, मी कधी पाकिस्तान, इस्लामाबादचा झालो हे कळले नाही. मी महाराष्ट्राचा मंत्री आहे. या भागातील हिंदू समाजासोबत आहे. जर याठिकाणी जबरदस्ती दफनभूमी दिली जात असेल. इथे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना वसवले जात आहे. त्यांना व्होट जिहादच्या माध्यमातून मतदान करायला लावत असतील तर याला रोखणे आणि हिंदू समाजाला ताकद देणे माझे काम आहे. अन्यथा याठिकाणी इस्लामीकरण करण्याचं काम या लोकांच्या माध्यमातून होतंय. जिथे तिथे अनधिकृत इमारती बांधायचा. तिथे बांगलादेशींना घरे द्यायची आणि व्होट जिहाद करायचा हा एकमेव कार्यक्रम आहे असं सांगत नितेश राणे यांनी बहुजन विकास आघाडीवर हल्लाबोल केला.
दरम्यान, कोणाचे कुठे आवळायचे आहेत हे आम्हाला चांगले माहिती आहे. गृहमंत्रीही आमचेच आहेत. महाराष्ट्राचे सरकार हिंदुत्ववादी विचारांचे आहे. मुख्यमंत्री हिंदुत्ववादी विचारांचे असतील तर येथेही आय लव्ह महादेव असणारे महापौर हवेत. हिंदू समाज म्हणून तुम्हाला एकजूट व्हावे लागेल. आमच्या उमेदवारांसोबत उभे राहिला तर १६ तारखेनंतर तुमचा विकास आणि सुरक्षेशी जबाबदारी आमची असेल. कुणीही धमकावत असेल तर ते आमच्यावर सोडा. तुम्ही चिंता घेऊ नका. पुढचे काय असेल ते आम्ही पाहू असंही नितेश राणे यांनी सांगितले.