"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 15:19 IST2025-12-27T15:17:56+5:302025-12-27T15:19:35+5:30
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील मित्रपक्षच काही ठिकाणी एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहे. भाजपाने महायुती करण्याचे आश्वासन दिले आणि ऐनवेळी दगाफटका केल्याचा आरोप आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे.

"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. जो मित्रांशी विश्वासघात करतो, तो मतदारांचाही विश्वासघात करू शकतो", अशा संतप्त भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) वसई विरारचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता स्वबळावर निवडणूक लढवणार अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली.
राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) दूर ठेवले आहे. वसई-विरारमध्ये सोबत निवडणूक लढवू असे भाजपाकडून सांगण्यात आले होते, असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे.
भाजपाने दगाफटका केला
"निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजपाकडून महायुतीचे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात एकही जागा देण्यात आली नाही. दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीये. युती केवळ नावापुरती ठरली आहे. युतीचे गणित असताना आम्ही सर्व बैठकींना हजर राहिलो. युती धर्म पाळला. पण भाजपाने आमच्याशी दगाफटका केला", अशी टीका मुळीक यांनी केली आहे.
"आमच्या पक्षाची ताकद नसती, तर भाजपाने आमचे उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केला नसता. आमचे उमेदवार पळवले गेले, हेच आमच्या ताकदीचे द्योतक आहे. कुणीतरी युती करत नाही म्हणून पक्ष थांबत नाही. त्यामुळे वसईमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार", अशी भूमिका आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे मुळीक यांनी मांडली आहे.
२०१५ मध्ये कोणाला मिळाल्या होत्या सर्वाधिक जागा?
वसई विरार महापालिकेची यापूर्वी २०१५ मध्ये निवडणूक झाली होती २०२० मध्ये मुदत संपली. तेव्हापासून महापालिकेवर प्रशासक राज आहे.
११५ नगरसेवक संख्या असलेल्या विरार वसई महापालिकेमध्ये गेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने सर्वाधिक १०६ जागा जिंकल्या होत्या. भाजपाला नगरसेवक निवडून आणता आला होता. तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसलाही पूर्ण अपयश आले होते. शिवसेनेने ५ जागा जिंकल्या होत्या, तर अपक्ष आणि इतर पक्षांचे ५ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी बहुजन विकास आघाडी मनसेसोबत आघाडी करणार आहे. तशी चर्चा सध्या सुरू आहे. उद्धवसेना स्वबळावर निवडणुकीत उतरणार आहे.