वर्ध्यात चोरट्यांचा धुमाकुळ; टायर पंक्चर करून दाम्पत्यास लुटले, दोन दिवसातली तिसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 17:09 IST2022-04-07T16:35:40+5:302022-04-07T17:09:45+5:30
जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यापूर्वी तीनवेळा अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. ५ एप्रिल रोजीही अशाचप्रकारे शेगाव येथून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या कारचे पंक्चर करून कारमधील लोकांना मारहाण करीत लुटण्यात आले.

वर्ध्यात चोरट्यांचा धुमाकुळ; टायर पंक्चर करून दाम्पत्यास लुटले, दोन दिवसातली तिसरी घटना
समुद्रपूर (वर्धा) : नागपूर जिल्ह्यातील वणी येथे कारने जात असताना अज्ञात चार लुटारुंनी रस्त्यावर काहीतरी टाकून कारचे टायर पंक्चर केले. कार थांबताच चालकाला मारहाण केली. तसेच कारमधील दाम्पत्यास मारहाण करीत त्यांच्याजवळून दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ६४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेला. ही घटना महामार्ग पोलीस चौकीच्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरडी शिवारात ७ तारखेला मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली.
आकिब खान उस्मान खान पठाण रा. वणी हा कारमध्ये (एम.एच. २९ एडी. ५७०८) एका दाम्पत्याला बसवून वणी येथे गावी जात होता. दरम्यान, मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अचानक कारचे समोरचे टायर पंक्चर झाले. रस्त्याच्या कडेला कार थांबवून खाली उतरुन पाहणी करीत असतानाच अचानक कारजवळ चार अज्ञात व्यक्ती आल्या आणि चालक व दाम्पत्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून रोख १६ हजार ५०० रुपये व पत्नीच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने, कानातील कर्णफुले, १२ ग्रॅमचे मंगळसूत्र असा एकूण ६४,५०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेत पळ काढला.
यापूर्वी तीनवेळा अशाच प्रकारच्या घटना घडल्या असल्याने घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी अरविंद येणोरकर व त्यांच्या टीमसह पथक रवाना केले. बोरखेडी टोल नाक्यावर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून शोध कार्य सुरु केले आहे. पंकज मसराम यांनी श्वान पथक बोलावून ठसे तज्ज्ञांना पाचारण करुन चौकशीला सुरुवात केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता समुद्रपूर पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांनी भेट देऊन गुन्ह्याच्या तपासासाठी मार्गदर्शन केले. पुढील तपास प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पंकज मेश्राम, सूर्यवंशी, जितेंद्र वैद्य, राजू शेंडे करीत आहेत.