Lok Sabha Election 2019; दिव्यांग व वृद्धांना स्वयंसेवकांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 10:15 PM2019-04-09T22:15:10+5:302019-04-09T22:19:10+5:30

राज्यभरात लोकशाहीचा उत्सव सुरु असून पहिल्या टप्प्यातच वर्ध्यातील लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्याकरिता ११ एप्रिलला मतदान होणार असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे.

Lok Sabha Election 2019; Volunteer support for Divyang and the elderly | Lok Sabha Election 2019; दिव्यांग व वृद्धांना स्वयंसेवकांचा आधार

Lok Sabha Election 2019; दिव्यांग व वृद्धांना स्वयंसेवकांचा आधार

Next
ठळक मुद्देगुरुवारी लोकशाहीचा उत्सव : अंधांकरिता ब्रेल लिपी मतपत्रिका, मतदानाकरिता प्रशासन झाले सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यभरात लोकशाहीचा उत्सव सुरु असून पहिल्या टप्प्यातच वर्ध्यातील लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्याकरिता ११ एप्रिलला मतदान होणार असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच मतदानाचा टक्का वाढावा आणि दिव्यांग व वृद्धांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्र स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विवेक भिमनवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, देवळी व हिंगणघाट तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (रेल्वे) व मोर्शी अशा सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. येत्या ११ एप्रिलला या सहाही मतदार संघात २ हजार २६ मतदान केंद्रावरुन मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यापैकी १ हजार ५५४ मतदार केंद्र शहरी भागात तर ४७२ केंद्र ग्रामीण भागात आहे. या मतदान केंद्रावर एकूण १७ लाख ४३ हजार २०६ मतदान मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये ८ लाख ९३ हजार १७१ पुरुष, ८ लाख ४८ हजार ६९१ महिला तर १९ इतर, १ हजार ३२५ सैनिक आणि ५ हजार ७०० दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. या सर्व मतदारांमध्ये १ हजार ३२१ हे नोकरीवर असलेले मतदारही आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी १८ हजार ६२५ नव मतदारांची नोंद करण्यात आली आहे. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता एकूण ८ हजार ७८८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून याशिवाय २२६ क्षेत्रिय अधिकारी, १ हजार ३२९ स्वयंसेवकही नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये एनसीसी, एनएसएस व स्काऊटच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. स्वयंसेवकांची संख्या आणखी वाढणार असून या स्वयंसेवकांना ओळखपत्रही देण्यात आले आहे.
उन्हाचा तडाखा जास्त असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्रावर २३ सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अंध मतदारांकरिता बॅलेट युनिटवरच बे्रल लिपीतही मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यांच्या सहकार्याकरिता सोबत एक प्रतिनिधी नेण्याचीही सूट देण्यात आली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदान होणार असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी संजय दैने व जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे उपस्थित होत्या.
आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
निवडणूक काळात आचारसंहिता असताना प्रचारा संबंधित कोणताही कार्यक्रम घेण्याकरिता प्रशासनाची रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असतानाही आष्टी तालुक्यातील भारसवाडा येथील कार्यकर्त्यांनी प्रशासनाची परवानगी न घेताच प्रचारसभा घेतली. त्यामुळे तक्रारीवरून तळेगाव (श्या.पं.) पोलीस ठाण्यात समीउल्ला खाँ पठाण व अजय लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली.
चार उमेदवारांना बजावली नोटीस
लोेकसभा निवडणूक रिंगणात असलेल्या १४ पैकी ४ उमेदवारांनी पेड न्यूज व सोशल मीडियाद्धारे प्रचार चालविला. त्यामुळे निवडणूक आयोगाने चारही उमेदवारांना नोटीस बजावली आहे. त्यामध्ये भाजपाचे उमेदवार रामदास तडस, काँग्रेसच्या चारुलता टोकस, लोकजागर पार्टीचे ज्ञानेश वाकुडकर व बहुजन वंचित आघाडीचे धनराज वंजारी यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त
लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी याकरिता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला आहे. आतापर्यंत ३०१ शस्त्र जप्त केले आहे. तसेच ९० टक्के पेक्षा जास्त प्रतिबंधक कारवाई केल्या असून तीन गँगवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. सेंट्रल आर्मी पोलीस फोर्स व केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या सहकार्याने १८ पथसंचलन करण्यात आले. तसेच पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेऊन मार्गदर्शनही करण्यात आले. आता मतदान काही तासांवर आल्याने कोंबिंग आॅपरेशन, रात्रीची गस्त, हॉटेल तपासणी व नाकाबंदी करण्यावर जोर असून कुठेही पैसा किंवा दारुचा वाटप होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. सर्व पोलीस ठाणे सज्ज करण्यात आले असून घटनास्थळी अवघ्या १५ ते २० मिनिटांत पोलीस दल पोहोचेल, अशी व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
आर्वीत दिव्यांग मतदारांची संख्या अधिक
प्रशासनाने दिव्यांग मतदारांना सहजनेते मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता विशेष सुविधा केल्या आहेत. सहाही मतदार संघाचा विचार केल्यास आर्वी विधानसभा मतदार संघात १ हजार ७५६, देवळी विधानसभा मतदार संघात १ हजार १, हिंगणघाट विधानसभा मतदार संघात १ हजार २०५, वर्धा मतदार संघात ६८७, धामणगांव मतदार संघात ६१० तर मोर्शी विधानसभा मतदार संघात ४४१ दिव्यांग मतदार आहेत. या आकडेवारीवरुन सर्वाधिक दिव्यांग मतदार आर्वी विधानसभा मतदार संघात असल्याचेच दिसून येत आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Volunteer support for Divyang and the elderly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.