शरद पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार अखेर राष्ट्रवादीत; 'तुतारी'वर लढणार लोकसभा

By रवींद्र चांदेकर | Published: March 29, 2024 09:09 PM2024-03-29T21:09:15+5:302024-03-29T21:15:08+5:30

निवडणूक अधिसूचना निघण्यापूर्वीच भाजपने उमेदवाराची घोषणा केली होती. त्यानंतर ‘वंचित’नेही उमेदवाराची घोषणा केली

Former Congress MLA finally joins NCP Amar Kale in sharad pawar; Lok Sabha will fight on trumpet | शरद पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार अखेर राष्ट्रवादीत; 'तुतारी'वर लढणार लोकसभा

शरद पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार अखेर राष्ट्रवादीत; 'तुतारी'वर लढणार लोकसभा

वर्धा : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असताना येथील जागेचा महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा सुटला नव्हता. अखेर शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेतला. त्यामुळे आता ते ‘तुतारी’वर लढणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

निवडणूक अधिसूचना निघण्यापूर्वीच भाजपने उमेदवाराची घोषणा केली होती. त्यानंतर ‘वंचित’नेही उमेदवाराची घोषणा केली. मात्र, महाविकास आघाडीने उमेदवाराची घोषणा केली नव्हती. वर्ध्याची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आली आहे. मात्र, उमेदवार ठरविताना पक्षाच्या नाकीनऊ आले होते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांना ‘तुतारी’वर लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला नव्हता. त्यामुळे काळे यांच्या उमेदवारीविषयी संभ्रम निर्माण झाला होता. अखेरीस शुक्रवारी सायंकाळी त्यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश घेतला आहे. 
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अमर काळे यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, कामगार नेते आफताब खान आदी उपस्थित होते. अमर काळे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे येथील जागेचा तिढा जवळपास संपुष्टात आल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शनिवारी मुंबईत काळे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप अमर काळे यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती आहे.

मुंबई येथे शुक्रवारी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेतला आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंती पाटील यांनी मला पक्षात प्रवेश देत स्वागत केले. यावेळी वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. उद्या, शनिवारी पत्रकार परिषदेत लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे. त्यात वर्धा लोकसभा मतदार संघातून माझ्या नावाचाही समावेश असेल.
अमर काळे.

Web Title: Former Congress MLA finally joins NCP Amar Kale in sharad pawar; Lok Sabha will fight on trumpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.