मच्छी नेणारा ट्रक पलटला, लोकांना माहिती मिळताच पिशवीतून मासे पळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 10:09 IST2021-02-06T10:05:22+5:302021-02-06T10:09:25+5:30
महामार्गावरील सत्याग्रही घाटातील घटना

मच्छी नेणारा ट्रक पलटला, लोकांना माहिती मिळताच पिशवीतून मासे पळवले
तळेगांव (शा.पं.) (वर्धा): नागपुर-मुंबई महामार्गावरील सत्याग्रही घाटामधील वळणावर ट्रकचे नियंत्रण बिघडल्याने मच्छी घेऊन जाणारा ट्रक रोडवर पलटी झाला. ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान घडली. यात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, ट्रक आणि ट्रकमधील मासळींचे मोठे नुकसान झाले आहे.
मालवाहू ट्रक क्रमांक डब्लु.बी.-२५, के.३०६४ मच्छी घेऊन कलकत्यावरुन मुंबईला जात होता. शनिवारी पहाटे ट्रक पाच वाजेच्या दरम्यान सत्याग्रही घाटात आला असता, वळणावर ट्रकचे नियंत्रण बिघडल्याने तो रोडवरच पलटला. सुदैवाने यात जिवितहानी झाली नाही. मात्र, त्यामधील मच्छी रोडवर बर्याच दूरपर्यंत अस्ताव्यस्त पडल्याने मोठे नुकसान झाले. तर काही काळासाठी रहदारीही ठप्प झाली होती. सदर घटनेची माहिती तळेगांव पोलिसांना मिळताच तळेगांव पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुधीर डांगे, राजु शाहु, गजानन बावणे, अमोल इंगोले, अनिल ढाकणे, नितेश वाधमारे, रुपेश उगेमुगे, विजय उईके, आशिष नेवारे, रोशन कैलुके, बालाजी मस्के आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, क्रेनच्या सहाय्याने ट्रकला रोडच्या कडेला घेऊन रहदारी सुरळीत केली. सदर, घटनेची नोंद तळेगांव पोलीसांनी घेतली असून अधिकचा तपास पोलीस करत आहेत.