भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये योगी आदित्यनाथ यांची डिमांड वाढली, 25 दिवसांत 67 हून अधिक रॅली आणि रोड शो 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 12:39 PM2024-04-25T12:39:39+5:302024-04-25T12:42:37+5:30

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशमध्ये 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत.

Yogi Adityanath demand among BJP's star campaigners, more than 67 meetings and road shows in 25 days, Lok Sabha Election 2024 | भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये योगी आदित्यनाथ यांची डिमांड वाढली, 25 दिवसांत 67 हून अधिक रॅली आणि रोड शो 

भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये योगी आदित्यनाथ यांची डिमांड वाढली, 25 दिवसांत 67 हून अधिक रॅली आणि रोड शो 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवारांचा प्रचार जोरात सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे स्टार प्रचारक विविध मतदारसंघात प्रचार सभा आणि रॅली घेत आहेत. दरम्यान, भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचारासाठी मागणी खूप वाढली आहे. हे त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या रॅली आणि रोड शो यावरून दिसून येते. 

उत्तर प्रदेशमध्ये 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत. परंतु, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 25 दिवसांत संपूर्ण राज्यात 67 हून अधिक रॅली, रोड शो आणि प्रबोधन परिषद घेऊन उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. दुसऱ्या टप्प्यात योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील आठही जागांवर अनेक रॅली, रोड शो घेऊन जनतेशी अधिक संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.

इतर 6 राज्यातही प्रचार 
भाजपाकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांनी आतापर्यंत इतर 6 राज्यांमध्येही भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी प्रचार केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा येथे प्रचार सभा घेऊन आपला निवडणूक प्रवास सुरू केला होता, तर दुसऱ्या टप्प्यात हनुमान जयंतीच्या दिवशी 'श्री राम'चा शेवटचा कार्यक्रम रोड शो होता.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आतापर्यंत महाराष्ट्र, जम्मू, उत्तराखंड, राजस्थान, बिहार आणि छत्तीसगडमध्ये सभा घेतल्या आहेत. यापैकी छत्तीसगडमधील राजनांदगाव, महाराष्ट्रातील वर्धा, राजस्थानमधील जोधपूर, राजसमंद, चित्तौडगड आणि बारमेर या जागांवर 26 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.

मथुरेतून निवडणूक प्रचाराला सुरुवात
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 27 मार्चपासून तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाची कमान सोपवण्याचे आवाहन सुरू केले होते. योगी आदित्यनाथ यांनी  27 मार्च रोजी मथुरेत पहिली प्रचार सभा घेतली होती. येथून योगी आदित्यनाथ यांनी भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी यांच्यासाठी प्रचार करत लोकांशी संवाद साधला, तर मेरठमधील भाजपा उमेदवार अरुण गोविल यांच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटचा प्रचार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.

लोकदलाच्या उमेदवारासाठीही जोरदार प्रचार 
बागपत मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाजपाचे सत्यपाल सिंह आहेत. यावेळी युतीमुळे ही जागा लोकदलाकडे गेली. लोकदलाचे उमेदवार डॉ.राजकुमार सांगवान येथून निवडणूक लढवत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी अनेकवेळा भाजपाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला, तर राजकुमार सांगवान यांच्यासाठी रात्रंदिवस प्रचार केला. 

उत्तर प्रदेशातील 8 जागांवर उद्या मतदान
उत्तर प्रदेशातील ज्या आठ जागांवर दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये यंदाच्या निवडणुकीत भाजपाने गाझियाबाद आणि मेरठमध्ये नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. सध्या व्हीके सिंह गाझियाबादचे खासदार आहेत आणि राजेंद्र अग्रवाल मेरठचे खासदार आहेत. भाजपाने गाझियाबादमधून आमदार अतुल गर्ग यांना उमेदवारी दिली असून अरुण गोविल हे मेरठमधून उमेदवार आहेत.

Web Title: Yogi Adityanath demand among BJP's star campaigners, more than 67 meetings and road shows in 25 days, Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.