Vasai Virar Mayor: वसई विरारमध्ये महापौरपदाचा तिढा! बविआतर्फे तिघांनी, तर भाजपाकडून एकाने भरला अर्ज, उपमहापौरसाठी तिघे मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:37 IST2026-01-30T18:35:48+5:302026-01-30T18:37:10+5:30
Vasai Virar Mayor Election 2026: वसई विरार महापालिका महापौर पदासाठी निवडणूक होत असून, बहुमत मिळवलेल्या बविआमधूनच तिघांनी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

Vasai Virar Mayor: वसई विरारमध्ये महापौरपदाचा तिढा! बविआतर्फे तिघांनी, तर भाजपाकडून एकाने भरला अर्ज, उपमहापौरसाठी तिघे मैदानात
- मंगेश कराळे, वसई विरार
वसई विरार महापौर निवडणुकीत बविआतर्फे अजीव पाटील, प्रफुल्ल साने आणि निषाद चोरघे यांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपाकडूनही ॲड. दर्शना त्रिपाठी यांनी अर्ज भरला आहे. उपमहापौर पदासाठीही बविआकडून कन्हैय्या भोईर व मार्शल लोपीस, तर भाजपातर्फे नारायण मांजरेकर यांनी अर्ज भरले आहे. बविआचे संख्याबळ आणि अनुभव पाहता अजीव पाटील यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित मानण्यात येत आहे.
वसई विरार मनपात बविआने ७१ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. महापौरपदासाठी अनेक नावे चर्चेत होती. शुक्रवारी अर्ज भरण्याच्या दिवशी बविआतर्फे नगरसेवक अजीव पाटील आणि प्रफुल्ल साने यांनी अर्ज भरले.
अजीव पाटील यांची निवड महापौर पदासाठी निश्चित मानली जात आहे. पक्षाचे संघटक सचिव असलेले अजीव पाटील हे हितेंद्र ठाकूर यांचे आत्येबंधू असून पक्षाचे प्रमुख नेते आहेत. ते सलग ३ वेळा नगरसेवक होते.
मनपात यापूर्वी ते स्थायी समिती सभापती होते. प्रभाग ४ मधून अजीव पाटील यांनी बविआ बंडखोर महेश पाटील यांचा पराभव केला होता. महापौरपदासाठी अर्ज करणारे प्रफुल्ल साने हे देखील अनुभवी नगरसेवक असून ते माजी पाणीपुरवठा सभापती आहेत. तर बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या अगदी जवळचे निषाद चोरघे यांनीही शेवटच्या क्षणी अर्ज भरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उपमहापौर ख्रिस्ती होण्याची शक्यता
बविआतर्फे उपमहापौरपदासाठी सर्वाधिक मतांनी निवडून आलेले मार्शल लोपीस आणि नायगावमधील ज्येष्ठ नेते कन्हैय्या भोईर यांनी अर्ज भरले. यंदा बविआतर्फे १० ख्रिस्ती नगरसेवक निवडून आले आहेत.
ख्रिस्ती मतदारांनी बविआला या निवडणूकीत साथ दिली होती. त्यामुळे ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून मार्शल लोपीस यांची उपमहापौरपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. ३ फेब्रुवारी रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी पीठासीन अधिकार्यांच्या उपस्थितीत विशेष महासभा घेऊन महापौर व उपमहापौर यांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
भाजपाकडून दर्शना त्रिपाठी यांचा अर्ज
बविआला स्पष्ट बहुमत असतानाही भाजपकडून लोटस ऑपरेशनची तयारी सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मनपातील संख्याबळ पाहता बविआचे ७१ नगरसेवक, तर महायुतीचे ४४ नगरसेवक निवडून आले आहेत.
महापौर आणि उपमहापौर बिनविरोध होऊ नये यासाठी भाजपाचे महापौर पदासाठी दर्शना त्रिपाठी आणि उपमहापौर पदासाठी नारायण मांजरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कमी संख्याबळ असूनही भाजपा आक्रमक भूमिकेत दिसून येत आहे.
ऑपरेशन लोटसचा इशारा
"आमची रणनिती काय आहे, हे आम्ही ३ फेब्रुवारीला दाखवू. आमच्याकडे ४४ नगरसेवक आहेत, आम्हाला फक्त १४ नगरसेवकांची गरज आहे. काहीही होऊ शकते", असे वक्तव्य करत भाजपा आमदार राजन नाईक यांनी लोटस ऑपरेशनचे संकेत दिले आहेत.