ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:09 IST2026-01-01T12:07:12+5:302026-01-01T12:09:32+5:30
ठाणे महापालिका निवडणुकीच रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच मनसे आणि उद्धवसेना यांचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकले गेले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवाराचाही अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले.

ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द?
ठाणे महापालिका निवडणुकीत एकत्र उतरलेल्या मनसे-उद्धवसेनेला पहिला झटका बसला. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्याही एका उमेदवाराचा अर्ज रद्द झाला आहे. प्रभाग क्रमांक १६, प्रभाग क्रमांक १७ आणि प्रभाग क्रमांक १८ मधून या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते. अर्ज बाद करण्यात आल्यानंतर तिन्ही पक्ष आक्रमक झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
कोणाचे अर्ज ठरले अवैध?
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील प्रभाग क्रमांक १६, प्रभाग क्रमांक १७ आणि प्रभाग क्रमांक १८ मधून रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे संदीप खरात, उद्धवसेनेचे अरविंद चव्हाण आणि मनसेच्या प्राची घाडगे यांचे अर्जात त्रुटी असल्याचे सांगत बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे मनसे-उद्धवसेना युतीचे दोन उमेदवार कमी झाले आहेत.
निवडणूक आयोगावर आरोप
या प्रकारानंतर मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. शिंदेसेनेच्या उमेदवार एकता भोईर यांच्या प्रतिज्ञापत्रात शेवटचे पान आणि त्यांची स्वाक्षरी नाही, तरीही त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला आहे.
प्राची घाडगे या वेळेत उपस्थित असूनही त्यांना बाहेर थांबवून ठेवले गेले आणि त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने काम करत आहेत. उमेदवार वेळेत येऊनही त्यांना थांबवून अर्ज बाद केले गेले, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन
मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले, "ज्यावेळी उमेदवार अर्ज दाखल करतो, त्यावेळी तो पडद्यावर दाखवावा लागतो. त्यानंतर छाननी प्रक्रिया सुरू होते. निवडणूक अधिकारी वैशाली मॅडम यांनी ११ वाजता फॉर्म डिस्प्ले करायला हवा होता. त्यांनी साडेतीन वाजता केला. तिथेच निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाले."
"निवडणूक अधिकाऱ्यांची मुलगी दुपारी फाईल घेऊन आली. आम्ही त्यांना विचारलं की कोणती फाईल आहे. त्यावर मॅडम म्हणाल्या की, डिप्रेशनच्या औषधीची फाईल होती. आम्ही त्यांना म्हणालो की, ही फाईल तुम्ही व्हॉट्सअपवर मागवू शकला असता. काही दिवसांपूर्वी आम्ही ठाण्यात आंदोलन केले होते की, निवडणूक अधिकारी भ्रष्ट नसावा. जाणूनबुजून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आमचा अर्ज अवैध ठरवला आहे", असा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.