TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:09 IST2026-01-15T19:06:07+5:302026-01-15T19:09:48+5:30
Thane Municipal Election Exit Poll Result 2026: महापालिका निवडणुकींसाठी मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल समोर येण्यास सुरूवात झाली आहे. ठाणे महापालिकेत शिंदेसेनेना मुसंडी मारणार असल्याचा कौल आहे.

TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
Thane Municipal Election 2026 Exit Poll Results: मुंबईनंतर ठाण्यात भाजपा आणि शिंदेसेना एकत्र लढत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वर्चस्व असलेल्या या महापालिकेचा निकाल काय लागणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये ठाणे शिंदेंचेच असल्याचे सिद्ध होणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारणार असल्याचे अंदाज एक्झिट पोलच्या कौलने दिला आहे.
'साम टीव्ही'चा एक्झिट पोल समोर आला आहे. ठाणे महापालिकेत शिंदेसेना आणि भाजपा युतीमध्ये लढत आहेत. उद्धवसेना आणि मनसे यांचीही युती आहे. त्यामुळे या महापालिकेची सत्ता कोण, राखणार आणि कोण सर्वात मोठा पक्ष ठरणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहेत. ठाणे महापालिकेबद्दलचा पहिला एक्झिट पोल समोर आला असून, त्यात शिंदेसेना ७२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा कौल देण्यात आला आहे.
पाहा, या सर्व महानगरपालिका निवडणुकांचे एक्झिट पोल Live
भाजपाला किती जागा मिळणार?
ठाणे महापालिकेमध्ये भाजपाला २६ जागा, तर शिंदेसेनेला ७२ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला १० जागा, तर काँग्रेसला ३ जागा, उद्धवसेनेला ३ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १५ जागा, मनसेला २ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
२०१७ मध्ये कोणत्या पक्षाने किती जागा जिंकलेल्या?
शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदा महापालिका निवडणूक होत आहे. २०१७ मध्ये जेव्हा शिवसेना एकत्र होती, तेव्हा शिवसेनेला ६७ जागा मिळाल्या होत्या. भाजपाने २३ जागा त्यावेळच्या निवडणुकीत जिंकल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे महापालिका निवडणुकीत ३४ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले होते, तर काँग्रेसला ३ जागाच जिंकता आल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे एआयएमआयएमला दोन जागा जिंकण्यात यश आले होते.
शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ठाणे महापालिकेची निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना एकत्र आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठं आव्हान नाहीये. उद्धवसेना आणि मनसे एकत्र असले, तरी पाहिजे तितके आव्हान निर्माण करू शकले नाही, असे चित्र प्रचारादरम्यान दिसले. त्यामुळे युतीतील दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक सोपी जाईल, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात आणि अभ्यासकांमध्ये आहेत.