ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:53 IST2026-01-01T13:52:40+5:302026-01-01T13:53:19+5:30
ठाणे महापालिकेत एकूण १३१ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात महायुतीकडून भाजपा ४० आणि शिंदेसेना ८७ जागांवर निवडणूक लढवत आहे

ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?
ठाणे - राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच प्रत्येक ठिकाणी तिकीट न मिळाल्याने इच्छुकांची नाराजी समोर येत आहे. दुसरीकडे कुख्यात गुंड मयूर शिंदे याने अवघ्या ८ दिवसांत २ पक्ष बदलून तिसऱ्यात पक्षातून उमेदवारी मिळवली आहे. मयूर शिंदे याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला आहे.
८ दिवस राजकीय ड्रामा
मयूर शिंदे २२ डिसेंबरपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेत सक्रीय होता. त्यानंतर २३ डिसेंबरला त्याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. सावरकर नगर प्रभाग क्रमांक १४ तून त्याला पक्षाचे तिकीट मिळेल अशी आशा होती. परंतु त्याठिकाणी तिकीट मिळणार नाही हे लक्षात येताच मयूर शिंदे याने पुन्हा पक्ष बदलला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले.
कोण आहे मयूर शिंदे?
मयूर शिंदे हा ठाण्यातील कुख्यात गुन्हेगारांपैकी एक आहे. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. इतकेच नाही तर मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाईही झाली आहे. २०२३ साली उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी मयूर शिंदेला अटक केली होती. २०१७ साली त्याने शिवसेनेकडून तिकीट मागितले होते परंतु त्याला पक्षाने तिकीट नाकारले होते. ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात भाजपा आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत मयूरने भाजपात प्रवेश केला होता. यावरून मोठा वाद झाला.
ठाणे महापालिकेत एकूण १३१ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात महायुतीकडून भाजपा ४० आणि शिंदेसेना ८७ जागांवर निवडणूक लढवत आहे. राज ठाकरे यांच्या मनसेची आणि उद्धवसेनेसोबत युती आहे. याठिकाणी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवत आहे. ठाण्यात १५ जानेवारीला मतदान होणार असून त्याचे निकाल १६ जानेवारीला घोषित होतील.