नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज नव्हे तर विजयाचा फॉर्म भरलाय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By अजित मांडके | Published: May 3, 2024 04:49 PM2024-05-03T16:49:32+5:302024-05-03T16:50:43+5:30

ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Naresh Mhaske has filled not the nomination form but Victory's form - Chief Minister Eknath Shinde | नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज नव्हे तर विजयाचा फॉर्म भरलाय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज नव्हे तर विजयाचा फॉर्म भरलाय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : ठाणे जिल्हा हा धर्मवीरांचा ठाणे जिल्हा आहे, बाळासाहेबांचा बालेकिल्ला आहे. सर्व पक्ष महायुतीच्या सोबत आहेत असून ते विकासाच्या सोबत आहेत. या ठिकाणी कितीही सभा झाल्या तरी बुथवर काम करायचे आहे, बुथवर काम करून हक्काचे मतदार आपल्याला उतरवायचे आहेत. मागील निवडणुकीत उमेदवाराला लीड कोणी दिला, मेहनत कोणी केली, मोदी सांगतात बुथची लढाई जिंका, मागच्या अनेक निवडणुकांचा रेकॉर्ड आपण तोडू शकतो, धर्मवीरांना साजेसे असे काम करायचे असून नरेश म्हस्के यांना निवडून आणण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.

ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी टेंभी नाक्यावर घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. देशाचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तर देश बुडवण्यासाठी इंडिया अलायन्स आहे. मोदींच्या विरोधात एक जण रॅली आणि सभा घेत आहे तो फेल जाणार असून मोदींना हरवणे कठीणच नाही तर अशक्य आहे असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केला आहे. विरोधकांकडे मशाल नसून आयस्क्रीमचा कोण आहे जो उन्हात वितळणार असल्याचा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावरही यावेळी निशाणा साधला. 

नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज नव्हे तर विजयाचा फॉर्म भरला आहे. मागचा उमेदवार आपल्याच मेहनतीवर निवडणूक आला असून आता ४०० पार मध्ये नरेश म्हस्के हवे की नको? असा सवाल करत बूथ स्तरावर जोरदार काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी उन्हा तान्हात लोकं एकत्र येत आहेत. या देशात यापूर्वी बॉम्बस्फोट आणि आतंकवादी कारवाया झाल्या. मात्र २०१४ नंतर एकाने तरी हिंमत केली का अशा कारवाया करण्याची. मोदींनी घरात घुसून मारूअसा दमच पाकिस्तानला दिला असून केवळ एवढ्यावर न थांबता सर्जिकल स्ट्राईक देखील केले. मोदी हे देशासाठी निरंतर काम करत असून त्यांनी आणि मी एक दिवस पण सुट्टी घेतली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या संविधानावर देश चालतो ते कोणीही बदलू शकत नाही उलट बाबासाहेबांना पराभूत करण्याचे काम काँग्रेसने केले हा इतिहास विसरता येणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. २०१५ नंतर मोदी यांनी संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा  
दोन वर्षात महायुतीच्या सरकारने केलेल्या कामाची पोचपावती मतदार देतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.  तुमचा मुख्यमंत्री ठाणेकर आहे, म्हणून दोन वर्ष बंद झालेला विकास सुरू झाला, दोन वर्षे सण बंद होते त्यावरचे निर्बंध काढले, फेस बुक, इंस्टा आणि घरी बसून सरकार चालवता येत का ?आधी पण मीच काम करत होतो क्रेडिट दुसरे घेत होते. कोरोना काळात पीपीई किट घालून काम केले, राज्य कर्त्यांच्या अहंकारामुळे राज्य अधोगतीला गेले होते, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.  

नाईकांची उपस्थिती
नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईमधून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राजीनामे देण्यात आले होते. तर ठाण्यातही नाराजी पाहायला मिळाली. त्यामुळे गणेश नाईक उपस्थित राहतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र अर्ज भरताना गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, आमदार मंदा म्हात्रे, गीता जैन, संजय केळकर , संजय वाघुले  हे भाजपचे नेते आवर्जून उपस्थित होते. शिंदे सेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे, आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दोन गटात हाणामारी
ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी अर्ज दाखल करतांना रॅली काढली होती. यावेळी ही रॅली मार्केटमधील जिल्हापरिषद कार्यालयाजवळ आली असता, यात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली.  ही हाणामारी कॅमेरात कैद झाली असून दोन गट एकमेकांसमोर आल्याने या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनतर पोलीसांनी पांगापांक केल्यानंतर परिस्थीती निवळली. मात्र दोन गटात झालेल्या हाणामारीतील ते पदाधिकारी कोण होते, हे मात्र समजु शकले नाही.

Web Title: Naresh Mhaske has filled not the nomination form but Victory's form - Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.